रेल्वेच्या कृपेनं पॅसेंजर सुरू पण तिकीटांची रक्कम आधीच्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 03:13 PM2021-09-28T15:13:11+5:302021-09-28T15:14:53+5:30
गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या आजपासून सुरू झाल्या. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गोंदिया :रेल्वे विभागाने तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी साहेब गाडी सुरू केली तर बरं झाले, पण तिकीट दुप्पट का केली हे मात्र कळेना असा सवाल करीत रेल्वे विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
काेरोनाच्या संसर्गामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर काही विशेष गाड्या सुरू केल्या. पण लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेला तब्बल दीड वर्षानंतर मुहूर्त सापडला. मात्र, या गाड्या सुरू करताना या गाड्यांच्या फेऱ्या मर्यादित ठेवल्या आहेत. शिवाय त्यांचे वेळापत्रकही प्रवाशांच्या दृष्टीने सुविधाजनक नाही. तर तिकिटाचे दर दुप्पट केले आहेत. पूर्वी गोंदिया ते चंद्रपूर या प्रवासासाठी प्रवाशांना ४५ रुपये मोजावे लागत होते. तर आता यासाठी ९५ रुपये मोजावे लागत आहेत.
गोंदिया-गोरेगावसाठी १० रुपये लागत होते तर आता ३० रुपये मोजावे लागत आहे. तिकीट दरात दुप्पट वाढ केल्याने याचा भुर्दंड गोरगरीब प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे रेल्वेने दीड वर्षानतर पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करीत प्रवाशांना दिलासा दिला. पण दुसरीकडे तिकीट दर दुप्पट वाढवून गोरगरीब प्रवाशांच्या खिशावरील भुर्दंड वाढवून त्यांना आर्थिक फटका दिला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गोंदिया-कटंगीचा नियम गोंदिया-बल्लारशाकरिता का नाही ?
रेल्वे विभागाने मंगळवारपासून (दि.२८) लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्या. पण गोंदिया-बालाघाट-कटंगी मार्गावर पॅसेंजर गाड्यांच्या दोन्हीकडून दोन दोन फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी ते सोयीचे झाले. मात्र, हाच नियम गोंदिया-बल्लारशा मार्गावरील प्रवाशांसाठी लागू केला नाही. या मार्गावर केवळ एक जाणारी आणि दुसरी परत येणारी अशी एकच फेरी सुरू केली. त्यामुळे प्रवाशांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे.
रेल्वे विभागाचे बोर्डाकडे बोट
गोंदिया-बल्लारशा या गाडीच्या विचित्र वेळापत्रकासंदर्भात गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हे वेळापत्रक रेल्वे बोर्डाकडून आले आहे. त्यामुळे आम्ही यात काहीच करू शकत नाही असे सांगत हात वर केले.
पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद
मंगळवारपासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू झाल्याने या गाड्यांना प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. काही रेल्वे स्थानकावर या गाड्यांचे स्वागत देखील करण्यात आले.
पूर्वीचे तिकीट दर
गोंदिया-चंद्रपूर : ४५ रुपये
गोंदिया- हिरडामाली : १० रुपये
बाराभाटी-ब्रम्हपुरी : १० रुपये
आताचे तिकीट दर
गोंदिया-चंद्रपूर : ९५ रुपये
गोंदिया-हिरडामाली : ३० रुपये
बाराभाटी-ब्रम्हपुरी : ३० रुपये