वरूणराजाच्या कृपेने शेतकरी सुखावला
By admin | Published: August 4, 2016 12:02 AM2016-08-04T00:02:15+5:302016-08-04T00:02:15+5:30
मागील १०-१२ दिवसांपासून सतत पावसाची वाट बघणारा बळीराजा दोन दिवसातील पावसाने सुखावला आहे.
रोवणीला पुन्हा प्रारंभ : पावसाची दमदार हजेरी
सालेकसा/गोरेगाव : मागील १०-१२ दिवसांपासून सतत पावसाची वाट बघणारा बळीराजा दोन दिवसातील पावसाने सुखावला आहे. सोमवारपासून वरूण राजाच्या कृपेने दमदार पाऊस पडत आहे. सालेकसा, गोरेगाव तालुक्यासह अनेक तालुक्यात पावसाने धमाकेदार पुनरागमन केल्याने काही नाल्यांना पूर येऊ्य मार्ग बंद झाल्याने नागरिकांची काहीशी गैरसोय झाली असली तरी पावसाची गरज असल्यामुळे सर्वांना समाधान व्यक्त केले आहे.
मंगळवारी सर्वत्र पाणीच पाणी साचलेले होते. काही नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाले होते. त्यामुळे शाळांनाही सुटी देण्यात आली होती. बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पूर ओसरला होता.
पावसाअभावी सर्वत्र रोवण्या मधातच खोळंबल्या होत्या. मागील आठ दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांची रोवणी व इतर ही शेतीची कामे बंद असून शेतीची औजारे निकामी पडले होते. परंतु आता मागील दोन दिवसात पुरेसा पाऊस पडला असून पुढील एक आठवड्यात सालेकसा तालुक्यात १०० टक्के भात रोवणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)
प्रथमच मेघगर्जनेसह पाऊस
यंदा पावसाचे आगमन पावसाच्या वाहनाप्रमाणे झालेले दिसून आले. सुरूवातीपासून आतापर्यंत पावसाने धावत्या स्वरूपात हजेरी लावली कारण की त्याचे वाहन कोल्हा आणि बेडून होते. कोल्हा आणि बेडकाला पावसाची गरज कमी असते तसेच त्यांची चाल धावती व उडी मारणारी असते. त्याचप्रमाणे पाऊस पण उडी मारत वादळ वाऱ्यासह धावत येत गेला आणि जात गेला. त्यामुळे तलाव जलाशयामध्ये हवे तेवढे पाणी साचले नाही. आता दोन दिवसांपासून पावसाचे वाहन हत्ती झाले असून हत्तीच्या गरजेप्रमाणे व त्याच्या चालीप्रमाणे पाऊस पडताना दिसून आला. हत्ती हा सर्वात जास्त पाणी पिणारा प्राणी असून तो कधीही धावत जात नाही. गर्जना करीत डौलाने चालत असतो. नेमका त्याचप्रमाणे पाऊस सुध्दा मेघगर्जनेसह डौलाने झमाझम पडताना दिसून आला. गावमोहल्यातील नाल्या, गटारे प्रथमच लबालब भरून जाताना दिसली.