ग्रा.पं.कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:34 AM2018-01-31T00:34:02+5:302018-01-31T00:34:29+5:30
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संघटनेची बैठक पार पडली. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संघटनेची बैठक पार पडली. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
१८ जानेवारी रोजी मुंबई येथे सह्यांद्री अतिथीगृहात नामदार मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची बैठक झाली. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास विभागाचे उपसचिव मंदार वैद्य, उपसचिव विजय भोसले, सामान्य प्रशासनाचे संजय बनकर, उपसचिव गिरीष भालेराव, कांबळे, यादव, अर्थ- वित्त व नियोजन विभागाचे सर्व उपसचिव तसेच अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने संबंधित विभागाला दिलेल्या मुदतीत अहवाल विनाविलंब सादर करण्याचे आदेश देण्यात आले. समितीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी व पेंशन देण्याबाबत समितीचा अहवाल प्राप्त होताच परळी येथे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अधिवेशन घेण्याचे आश्वासन नामदार मुंडे यांनी दिले. यावेळी राज्य युनियनचे विलास कुमलवार, राज्य उपाध्यक्ष सपना गावंडे, मराठवाडा अध्यक्ष दयानंद साहू, राज्य सरचिटणीस गिरीषा दाभाडकर, दिलीप डिके, कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काजी, भाऊसाहेब ढोकणे, गोंदिया जिल्हाध्यक्ष धनराज तुमसरे तसेच २१ जिल्ह्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
परळी येथे होणाऱ्या अधिवेशनात नामदार मुंडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी व पेंशन जाहीर करणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी मोठ्या संख्येत हजर रहावे असे, राज्य सरचिटणीस गिरीष दाभाळकर, जिल्हा सचिव छगनलाल अग्रेल, मुन्ना मेश्राम, सुनील भेलावे, धर्मराज काळसर्पे, नरेंद्र टेंभुरकर, माधव सेऊतकर, मोहन देसाई, द्वारकाप्रसाद कुंभलवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.
मांडोदेवी येथे संघटनेची सभा
रविवारी (दि.४) गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान बघेडा (तेढा) येथे सकाळी १०.३० वाजता राज्य सरचिटणीस गिरीष दाभाडकर, राज्य उपाध्यक्ष सपना गावंडे, अशोक कुथे व जिल्हाध्यक्ष जयदेव अंबुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेची सभा आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित रहावे असे संघटनेचे जिल्हा सचिव अग्रेल यांनी कळविले आहे.