धान चोरी करणारी टोळी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:07+5:302021-06-19T04:20:07+5:30
गोंदिया : शेतकऱ्यांचे धान चोरून नेणाऱ्या टोळीचा सालेकसा पोलिसांनी २४ तासांच्या आत उलगडा केला असून, यात टोळीतील पाच सदस्यांना ...
गोंदिया : शेतकऱ्यांचे धान चोरून नेणाऱ्या टोळीचा सालेकसा पोलिसांनी २४ तासांच्या आत उलगडा केला असून, यात टोळीतील पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी चोरलेले धानसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.
ग्राम जांभळी येथील राजकुमार ब्रिजलाल मडावी (वय ४५) यांच्या घरकुलात ठेवलेले ८१६० रुपये किमतीचे धानाचे १५ कट्टे बुधवारी (दि. १६) चोरीला गेले होते. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी भादंवि कलम ३८०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रमोद बघेले व पोलीस नायक भूपेश कटरे यांनी हाती घेतला असता, बातमीदारांकडून गुप्त माहिती मिळाली. यावरून त्यांनी जांभळी येथीलच राजेंद्र टेकचंद ढेकवार (३२), गोपाल कुंजीलाल लिल्हारे (३२), ओमप्रकाश शंकरलाल लिल्हारे (२३), हिरालाल गोमाजी कुंजाम (४७) व मिथुन पुनालाल ढेकवार (२७) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यात त्यांनी धानाचे कट्टे चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेला धानही जप्त केला आहे. ही कामगिरी ठाणेदार बघेले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुनील जानकर, तपासी अधिकारी नायक कटरे, हवालदार तोषांत मोरे, नायक बिजेंद्र बिसेन, प्रमोद सोनवाने, अजय इंगळे, आदींनी पार पाडली आहे.