धानाची अजूनही उचल नाही, विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:46+5:302021-08-02T04:10:46+5:30
सडक-अर्जुनी : रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जि.प.च्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा ...
सडक-अर्जुनी : रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जि.प.च्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण अद्यापही या धानाची उचल करण्यात आली नसल्याने आता विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
रब्बीतील धान खरेदीवर गोदामांअभावी परिणाम हाेऊन त्याचा भुर्दंड शिक्षकांना बसू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शाळा इमारतींचा शाळा सुरू होईपर्यंत गोदाम म्हणून वापर करण्यास परवानगी दिली. आरटीई ॲक्टनुसार कार्यवाही करण्याची बाब नोंदवून तालुक्यातील आश्रमशाळा व इतर शाळांच्या इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आश्रमशाळा व इतर ठिकाणी आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था यांच्यामार्फत धान साठवून ठेवण्यात आले. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने ५ जुलै रोजी शाळा सुरू करण्याचे पत्र काढले, तर आदिवासी विकास विभागाने २६ जुलैच्या परिपत्रकानुसार २ ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आश्रमशाळा व्यवस्थापनाचे दीर्घ काळापासून बंद असलेली शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु शाळा इमारतींमध्ये धान साठविले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह निवासी शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न आश्रमशाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. यापूर्वी प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, भंडारा यांनी ही समस्या लक्षात घेऊन १६ जुलैला उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ मर्या., नवेगाव यांना पत्र पाठवून आश्रमशाळेत खरेदी करण्यात आलेले धान्य अन्य ठिकाणी वाहतूक करून आश्रमशाळा इमारत रिकामी करण्याचे निर्देश दिले. प्रकल्प अधिकारी देवरी यांनीही ९ जुलैला आश्रमशाळांच्या इमारतीमध्ये खरेदी केलेले धान त्वरित खाली करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले. मात्र, यानंतरही धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारपासून (दि.२) शाळा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा प्रश्न आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
..............
आदिवासी विकास महामंडळाचे वेळकाढू धोरण
आश्रमशाळा प्रशासनाने २६ जुलैच्या पत्रानुसार शाळा सुरू करण्याचे आदिवासी विभागाचे पत्र मिळताच २८ जुलैला शाळा इमारत खाली करून देण्याबाबत आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कनेरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक नवेगाव, तालुका पुरवठा अधिकारी सडक अर्जुनी संबंधित संस्थेच्या उपाध्यक्षांकडे पाठपुरावा केला; पण यानंतरही संबंधित यंत्रणेकडून धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.