थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली आहे चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 09:17 PM2022-11-10T21:17:10+5:302022-11-10T21:18:01+5:30
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे.
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.
१८ डिसेंबरला होणार मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नाेव्हेंबर ते २ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर २० डिसेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे.
निकालासाठी करावी लागणार दोन दिवस प्रतीक्षा
निकालासाठी करावी लागणार दोन दिवस प्रतीक्षा
जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे गावचा पुढारी आणि सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भूमिपूजन व राजकीय कार्यक्रमांना ब्रेक
- निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या तारखेपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा, बैठका, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे.
मंडई उत्सवातून संपर्क
- जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. सध्या मंडई उत्सव जोरात सुरू असून याच दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने मंडई उत्सवाच्या माध्यमातून भावी उमेदवार जनसंपर्क वाढवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
भाऊ रामरामला झाली सुरुवात
- ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भावी उमेदवारांनी भाऊ रामराम म्हणण्यास सुरुवात झाली आहे. कधी रामराम न घेणारे आता आर्वजून रामराम घेत आहेत.
भावी उमेदवार ॲक्टिव्ह मोडवर
- ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांच्या याद्या घेण्यासाठी भावी उमेदवारांची गर्दी दिसून आली.