आज थंडावणार निवडणूक प्रचाराच्या तोफा; उमेदवारांचा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

By कपिल केकत | Published: December 16, 2022 02:07 PM2022-12-16T14:07:17+5:302022-12-16T14:17:10+5:30

छुप्या पद्धतीने होणार प्रचार : भेटीगाठीतून केली जाणार मतदारांसोबत सेटिंग

Gram Panchayat election : today is the last day of campaigning | आज थंडावणार निवडणूक प्रचाराच्या तोफा; उमेदवारांचा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

आज थंडावणार निवडणूक प्रचाराच्या तोफा; उमेदवारांचा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

googlenewsNext

गोंदिया : ७ डिसेंबरपासून अवघ्या जिल्ह्यात उडत असलेला ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा अखेर शुक्रवारी (दि. १६) शमणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांकडून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार. त्यातही आता उमेदवारांकडून थेट भेटीगाठीतूनच मतदारांसोबत फायनल सेटिंग केली जाणार आहे.

जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, ७ डिसेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप झाले व तेव्हापासूनच प्रचाराचा धुराळा उडत आहे. पंचायत राज व्यवस्था व १५ व्या आयोगामुळे सरपंचपदाला विशेष प्राप्त झाल्याने यंदाची ग्रामपंचायत निवडणूक आता लहानशी समजली निवडणूक राहिली नाही. यामुळेच रिंगणात उतरलेल्या पॅनल व त्यांच्या पाठीशी असलेल्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी नेते मंडळीही मैदानात उतरले असून, उमेदवारही रात्रंदिवस एक करून गावातील एक-एक घर पिंजून काढत आहेत.

आता निवडणूक म्हटली म्हणजे प्रचाराशिवाय काही जमत नाही. अशात आपण प्रचारात कमी राहू नये, यासाठी उमेदवार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. यामध्ये सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे दिसत असून, निवडणूक एकदम हायटेक झाली आहे. तर दुसरीकडे गावातील गल्लीबोळातही होर्डिंग-पोस्टर झळकत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची परिभाषाच आता बदलून गेली आहे. मात्र, रविवारी मतदान येत असून, नियमानुसार शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराला विराम लागणार असून, प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

मतदारांना खुश करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन

उमेदवारांकडून निवडणूक लागताच आपल्या कार्यकर्ता व मतदारांसाठी पार्ट्या सुरू झाल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर सर्वांना खुश करणे गरजेचे राहत असून, ज्याने हा हात मारला त्याला मतदार पावणार, असे राजकारणातले गणित मानले जाते. यामुळे उमेदवारांकडून आता मतदारांना खुश करण्यासाठी पार्ट्या सुरू झाल्या आहेत. जे पाहिजे त्याची व्यवस्था मतदारांसाठी केली जात आहे. यामुळेच ढाबे, हॉटेल्स व शेतात पार्ट्यांचे आयोजन सुरू झाले आहे.

मी तुमच्यातीलच एक हे दाखविण्याचा प्रयत्न

यंदाची निवडणूक काहीही करून जिंकायची असल्याने आता उमेदवार गावातील घराघरांत जाऊन मतदारांना मी तुमच्यातीलच एक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आपले जुने संबंध असल्याने मीच तुमच्यासाठी धावून येणार, असे फंडे उमेदवारांकडून अवलंबिले जात आहेत.

यंत्रणा लागली कामाला

- जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींमधील ३४८ सरपंच व ३०२२ सदस्यपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून, यासाठी जिल्ह्याची यंत्रणा कामाला लागली आहे. रविवारी मतदान होणार असल्याने शुक्रवारी प्रचाराला विराम लागणार आहे. तर शनिवारीच निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचावे लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही सरपंच व सदस्य अविरोध निवडून आले आहेत.

जिल्ह्यातील स्थितीचा तक्ता

तालुके- ग्रामपंचायत- सदस्य उमेदवार- सरपंच उमेदवार

  • गोंदिया - ७१- १६२३- २३१
  • गोरेगाव- ३०- ५११-६८
  • अर्जुनी-मोरगाव- ४०- ६६७- १३३
  • देवरी- २५- ३६७- ७९
  • सडक-अर्जुनी- ४३- ६६४- १२६
  • सालेकसा- ३१- ४९५- ८२
  • आमगाव- ३४- ५७८- ८०
  • तिरोडा- ७४- १३०५- २०८

Web Title: Gram Panchayat election : today is the last day of campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.