पंचायत समितीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:03 PM2018-04-05T21:03:44+5:302018-04-05T21:03:44+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तालुका गोंदियातर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तालुका गोंदियातर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.
यात महासंघाचे राज्य सचिव मिलिंद गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, तालुकाध्यक्ष मुन्नालाल ठाकरे, तालुका सचिव राजेंद्र हटेले यांच्या नेतृत्वात राजलक्ष्मी चौकातून मोर्चा काढून पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन बीडीओ यांना देण्यात आले.
महासंघाने कर्मचाऱ्यांच्या स्थानिक मागण्यांना घेवून जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर मोर्चा व धरणे आंदोलनाचे आवाहन केले होते. त्या अनुसषंगाने सदर मोर्चा काढण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भत्ता त्वरित अदा करा, नियमाप्रमाणे वेतन भत्याच्या एकूण रक्कमेवर दरमहा ८.३३ टक्के भविष्य निर्वाह निधी जमा करा, वैयक्तिक गट विमा योजना लागू करा, आॅनलाईन वेतन प्रणालीची प्रक्रिया पूर्ण करा, सर्व सेवाशर्तीची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी. अंमलबजावणीे न करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कर वसुली करिता केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवून अनुदानात कपात करणे व नियमाप्रमाणे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याचे टाळणे बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांच्या निवेदनावर कार्यवाही करण्याकरिता ६ एप्रिलला संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन बीडीओ डॉ. पानझाडे यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुखदेव शहारे, सहसचिव मोहन डोंगरे, संगठन सचिव महेंद्र भोयर, महेंद्र कटरे, ताराचंद बावणकर, मुकेश उपराडे, मानिक उके, राजकुमार लिल्हारे, अरविंद दुधबुरे, रवि जमरे, अशोक बिसेन, ओंकार दिहारी, संगीता चौरे इत्यादी कार्यकर्ते व कर्मचारी सहभागी झाले.