स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभा ठरल्या वादळी
By admin | Published: August 18, 2016 12:33 AM2016-08-18T00:33:29+5:302016-08-18T00:33:29+5:30
येरंडी-देव येथे स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी आमसभा झाली. सदर सभा ग्रामपंचायत कार्यालयाच्या खुल्या जागेत झाली.
नागरिकांचा दिसला रोष : येरंडीत तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत गदारोळ
बाराभाटी : येरंडी-देव येथे स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी आमसभा झाली. सदर सभा ग्रामपंचायत कार्यालयाच्या खुल्या जागेत झाली. सभेत अनेक विषयांचा विरोध नागरिक करत होते. तसाच गदारोळ तंटामुक्ती समितीची निवडीत होवून गुंड प्रवृत्तीचा प्रकारही आढळला.
सभेत गावातील मिनी मंत्रालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामसेवकांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचले. काही कामांची तरतूद करण्यात आली. २०१५-१६ वर्षातील नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्यांना मिळणारे घरकुल हा रद्द केले जाईल. सभेत १५०-२०० नागरिक हजर होते. १४ व्या वित्त आयोगातून सार्वजनिक ठिकाणी सिमेंट खुर्च्या बनणार आहेत. पारंंपरिक वनवासी अनुसूचित जाती-जमातीची समिती स्थापन करण्यात आली.
सर्व ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांच्या समोर नागरिक एकमेकांवर उठायचे, अपशब्दांचा वापर होत होता. तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीचा प्रश्न प्रलंबित ठेवला तर दुसऱ्या गटाने ग्रामसभेच्या अध्यक्षाची कुठलीही परवानगी न घेता स्वत:ला घोषित करण्याचा निर्णय घेतला. तंमुस समिती शासन निर्णयानुसार गठित झाली नाही. या समितीत विविध सार्वजनिक सेवा देणारे नागरिक असतात, पण त्यांचा समावेश नाही. गदारोळप्रसंगी परिसराचे बिट जमादार यांचा अपमान झाला, असे नवेगावबांध पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गावातील संपूर्ण सार्वजनिक ठिकाणच्या पानटपरी, दुकाने, प्रवासी निवारा येथील दुकान हटविण्यात येणार आहेत. नाल्यांवरील सरपणाची लाकडे रस्त्यावरील खासगी वाहने, गुरे-ढोरे हे रस्त्यावरून हटविण्यात येणार आहेत. मात्र सभेत सभ्य, सामंजस्याचा कुठलेही वर्तन नाही. नुसता कल्लोळच होता. सभेला निमंत्रक, गावाचे नागरिक, तरूण मुले-मुली, पोलीस कर्मचारी आदी प्रामुख्याने हजर होते. सचिवाने यावेळी लेखा-जोखा लिहिला नाही.
ग्रामसभा ठरली वादळी
गोठणगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर १५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये विषय दिल्यावर चर्चा करण्यात आली.
प्रथम ग्रामसभेच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने अध्यक्ष पदावर सरपंच शकुंतला वालदे यांची निवड झाली. सभेला विशेष मार्गदर्शक म्हणून जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बन्सोड यांनी भेट दिली. चौदाव्या वित्त आयोगाबाबद येणारा निधी हा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे न येता शासनाकडून सरळ ग्रामपंचायतला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक नागरिकांनी ग्रामसभेमध्ये विकसित कामाची निवड करून, काम देऊन कार्यान्वित करावे. सध्या दूषित पाण्याचा वापर होत आहे. त्याकरिता आरओची व्यवस्था प्रथम करावी. नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, असे म्हणाले.
ग्रामसभेमध्ये शौचालय बांधकाम, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामविकास आराखडा व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना याविषयावर वादळी चर्चा झाली व सभेमध्ये व्यत्यय निर्माण झाले. ज्या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला त्यांनीसुध्दा घरकुलासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे वादळी सभा होऊन सभेला गुंडाळण्यात आले. तंटामुक्त समितीच्या सभेचे आयोजन ३१ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आले आहे.
ग्रामसभेत गोंधळ
काचेवानी : स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभेत शांतता राहावी, या दिवशी गावात विकासात्मक कामाची आखणी करण्यात यावी, लेखा-जोखा हिशेब टाळण्याचे निर्देश शासनाचे आहेत. परंतु झालेल्या अनेक ग्रामसभेत गोंधळच-गोंधळ पाहाण्यात आले आहे. काही गावात तर महिला सरपंचाची मानहानी व अपमानजनक गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याचे वृत्त आहे.
तिरोडा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत पंतप्रधान आवास योजनेची यादी पुरविण्यात आली आहे. लहान गावात शंभरच्या वर आणि मोठ्या गावात दोनशेच्या वर आवास योजना मंजूर झाल्याची चर्चा पसरली. मंजूर यादी आणि त्यात असलेली नावे पाहून सगळीकडे असंतोष व रोष पसरला आहे. सर्वच ग्रामपंचायतमध्ये गोंधळासारखी स्थिती पहायला मिळाली. या व्यतिरिक्त गावाच्या विकासावरुन व झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सभेत गोंधळ उत्पन्न झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेची यादी ग्रा.पं.ला पुरविण्या आली. ती आर्थिक सर्वे २०११ ला करण्यात आलेल्या सर्वेनुसार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सर्वाधिक कमी उत्पन्न किंवा घराची स्थिती पाहून तयार करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत कार्यालयाने स्वत: तयार करून पाठविली नाही. या यादीमध्ये ज्यांचे पक्के घरे आहेत, ज्यांना यापूर्वी लाभ मिळाला आहे, जे आर्थिक परिस्थितीने कमजोर नाहीत, अशा व्यक्तीचे नावे आहेत.
काही लहान मुलांचेही नावे असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. तर ज्यांना घराची सुविधा नाही, रहायला घर नाही अशा व्यक्तींच्या परिवाराचे नाव या यादीत नसल्याने अनेक गावातील नागरिकांचे संतुलन आटोक्याबाहेर गेल्याची माहिती आहे. (वार्ताहर)