ग्राम स्वराज्य अभियानाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:11 AM2018-04-19T01:11:34+5:302018-04-19T01:11:34+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ तालुक्यातील येरंडी-देव ग्रामपंचायतमध्ये करण्यात आला.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कबीरदास रामटेके होते. मार्गदर्शक म्हणून पं.स. गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमईवार, उद्घाटक सरपंच रेखा खोब्रागडे, अतिथी म्हणून उपसरपंच लक्ष्मण बागडे, सामजिक कार्यकर्ते रत्नदीप दहिवले, अनिल दहीवले, ग्रा.पं. सदस्य अस्मिता रामटेके, राजन खोब्रागडे, बालक बोरकर, पोलीस पाटील खेमराज गेडाम, तंमुसचे अध्यक्ष सुरेश रंगारी, नरेश खोब्रागडे, वनमाला चौरे, प्यारेलाल रंगारी, विठ्ठल तागडे, कैलास इस्कापे, माजी सरपंच व्यंकट खोब्रागडे, लैलेश्वर शिवणकर, विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे, ग्रामसेवक टी.पी. हुकरे तथा गावकरी उपस्थित होते.
सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व तथागत बुद्ध यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलित करुन सरपंच रेखा खोब्रागडे यांनी ग्राम स्वराज्य अभियानाचे उद्घाटन केले. कबीरदास रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बुद्धवंदना घेवून अभियानाला सुरुवात करण्यात आली. विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी प्रास्ताविकातून ग्रामस्वराज्य अभियानाची माहिती देवून जिल्हा स्तरावरुन येरंडी (देव) ग्रामपंचायतची या अभियानासाठी निवड झाल्याचे सांगितले.
या वेळी गट विकास अधिकारी जमईवार यांनी मार्गदर्शनातून, महाराष्टÑ शासनाच्या वतीने १४ एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनापासून ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्याबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर कालावधीत जास्तीत जास्त गरीब कुटुंब असलेल्या गावांची निवड करण्यात आली आहे. ‘सबका साथ-सबका विकास’ या विशेष मोहिमेद्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री बिजली घर योजना (सौभाग्य), प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व मिशन इंद्रधनुष्य अशा प्रकारच्या योजना सर्व गावांमध्ये राबवून त्या ठिकाणी सर्व योजना १०० टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३ गावांचा समावेश असून त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील घोगरा, आमगाव तालुक्यातील कुंभारटोली व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी (देव) या गावांचा समावेश आहे. यासाठी केंद्र शासनाने जिल्हानिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. १८ एप्रिल रोजी स्वच्छ भारत दिवसानिमित्त ग्रामसफाई व शौचालय सफाई अभियान राबविले, २० एप्रिल रोजी उज्ज्वला दिवसानिमित्त प्रत्येक घरात गॅस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी राष्टÑीय पंचायत राज दिवस या निमित्त गावकऱ्यांना भेडसावणाºया विविध अडचणी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. २८ एप्रिल रोजी ग्राम स्वराज्य दिवस म्हणून प्रत्येक घरी वीज कनेक्शन हा उपक्रम होईल. ३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस म्हणून आरोग्य संदर्भात विशेष मार्गदर्शन, २ मे रोजी शेतकरी कल्याण दिवस निमित्ताने शेतकरी सुदृढ या विषयावर मार्गदर्शन होईल. ५ मे रोजी आजीविका दिवस या निमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येईल. अशी या अभियानाची सविस्तर माहिती खंड विकास अधिकारी जमईवार यांनी दिली.
प्रास्ताविक विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे यांनी मांडले. संचालन सतिश मेश्राम यांनी केले. आभार ग्रामसेवक पी.एस. हुकरे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामवासी महिला-पुरुष व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.