१.३२ कोटींचा अपहार करणारा ग्रामसेवक फरार, ग्रामपंचायतमधील दस्तावेज अजूनही गायबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 02:59 PM2022-01-25T14:59:19+5:302022-01-25T15:19:09+5:30
त्या निलंबित ग्रामसेवकाने निलंबनानंतरही ग्रामपंचायत सभा घेतल्या व दाखले दिले. संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते सुरूच असल्याने संधीचा फायदा घेत बँकेतून पैसे काढल्याचीही चर्चा होती.
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव, इटखेडा, इसापूर, कोरंभी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या विनोद श्रीवास्तव याने ६ ऑक्टोबर २०२० ते १ सप्टेंबर २०२१ या काळात एक कोटी ३२ लाख ५२ हजार २६३ रुपये ८३ पैशांचा अपहार केला.
या संदर्भात अर्जुनी-मोरगाव येथील गटविकास अधिकारी विलास रामकृष्ण निमजे (५६) यांच्या तक्रारीवरून ग्रामसेवकावर भादंविच्या कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मात्र ग्रामसेवक श्रीवास्तव फरार आहे.
अपहार केल्यानंतर ग्रामसेवक व्ही. एस. श्रीवास्तव याला २३ जून रोजी २०२१ रोजी निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर ग्रामपंचायतींचे कॅशबुक, चेकबुक व दस्तावेज गहाळ झाल्याची बाब लक्षात आली होती. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम इटखेडा, महागाव, कोरंभी व इसापूर या ४ ग्रामपंचायतींचा कार्यभार ग्रामसेवक श्रीवास्तवकडे होता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांनी २३ जून रोजी त्याला निलंबित केले होते.
निलंबनानंतर त्यांनी इतरांकडे कार्यभार सोपविला नाही. अशात कपाट तोडून पंचनामा तयार करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायतींचे कॅशबुक, चेकबुक व इतर महत्त्वपूर्ण दस्तावेज गायब असल्याचे दिसून आले. त्या निलंबित ग्रामसेवकाने निलंबनानंतरही ग्रामपंचायत सभा घेतल्या व दाखले दिले. संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते सुरूच असल्याने संधीचा फायदा घेत बँकेतून पैसे काढल्याचीही चर्चा होती. यासंदर्भात इटखेडा ग्रामपंचायत सदस्य राकेश शेंडे यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यावर प्रशासनाचे डोळे उघडले.
४ मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार
या ग्रामसेवकाला आर्थिक देवाण-घेवाण करण्याचे अधिकार प्रदान करू नये, असे आदेश असतानाही त्याच्याकडे ४ मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला होता. हा कारभार देणाऱ्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी अहवाल गुपित ठेवण्यात आला.
पोलीस तपासात अपहाराची रक्कम वाढेल?
झालेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दोन कोटी २५ लक्ष ९१ हजार ६९१ रुपयांचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. यात महागाव ग्रामपंचायतमध्ये एक कोटी १० लक्ष ९३ हजार ६०९, इटखेडा ग्रामपंचायतमध्ये ४७ लक्ष ९० हजार १३६, इसापूर ग्रामपंचायतमध्ये १३ लक्ष ८७ हजार २५२ तर कोरंभी ग्रामपंचायतमध्ये ५३ लक्ष २० हजार ६९४ अपहार झाल्याचा ठपका होता. परंतु एफआयआरमध्ये १.३२ कोटींचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. पोलीस तपासात अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.