दवनीवाडा येथील ग्रामसेवक व शाखा अभियंता निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:16+5:302021-09-04T04:34:16+5:30
गोंदिया: १४ व्या वित्त आयोगातून सन २०१९-२० मध्ये दवनीवाडा येथील हायस्कूलच्या आवारभिंत बांधकामासाठी मंजूर झालेल्या पैशातून बांधकाम न करताच ...
गोंदिया: १४ व्या वित्त आयोगातून सन २०१९-२० मध्ये दवनीवाडा येथील हायस्कूलच्या आवारभिंत बांधकामासाठी मंजूर झालेल्या पैशातून बांधकाम न करताच २५ लाख रुपयांची उचल करण्यात आली. यासंदर्भात ग्रामसेवक पी. एस. बिसेन, सरपंच नरहरप्रसाद कमलाप्रसाद मस्करे, तत्कालीन उपअभियंता ठवकर, जि. प. सा. बां. उपविभाग गोंदिया शाखा अभियंता गायधने हे चौघे दोषी असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. यातील ग्रामसेवक पी. एस. बिसेन, जि. प. सा. बां. उपविभाग गोंदिया शाखा अभियंता गायधने या दोघांना २ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांनी केली आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांकरिता लागणाऱ्या साहित्याकरिता ग्रामपंचायतीने ई-निविदा मागविली होती किंवा नाही? याबाबतचे दस्तऐवज चौकशीच्या वेळी उपलब्ध करून दिले नाही. निविदा बोलावण्यात आली होती किंवा नाही, याची खात्री चौकशी समितीला पटली नाही. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद हायस्कूल दवनीवाडा येथील आवार भिंत बांधकामाकरिता जिल्हा वार्षिक योजना व १४ वा वित्त आयोगांतर्गत २५ लाख रुपये किमतीचे काम मंजूर केले. ग्रामपंचायत दवनीवाडा, जिल्हा परिषद हायस्कूल दवनीवाडा येथील सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आवार भिंत बांधकामाकरिता २५ लाख मंजूर करून घेतले. परंतु, बांधकाम न करताच पैशाची उचल करण्यात आली आहे. याकरिता ग्रामसेवक बिसेन व शाखा अभियंता गायधने यांना निलंबित करण्यात आले आहे.