ग्रामसेवक व सरपंचाने हडपले
By admin | Published: May 20, 2017 01:50 AM2017-05-20T01:50:39+5:302017-05-20T01:50:39+5:30
देवरी तालुक्याच्या देवाटोला येथील सचिव व सरपंचाने माझ्या बांधकामाच्या साहित्याचे दोन लाख २३ हजार रुपये हडपले आहे.
दोन लाख परत करा : दोन दिवसात आत्मदहनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्याच्या देवाटोला येथील सचिव व सरपंचाने माझ्या बांधकामाच्या साहित्याचे दोन लाख २३ हजार रुपये हडपले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. दोन दिवसात माझे पैसे न मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या इमारतीवरुन उडी घेवून आत्मदहन करण्याचा इशारा दांडेगाव येथील कंत्राटदार हिरामन केशोराव बावणकर यांनी दिला आहे.
देवरी तालुक्याच्या देवाटोला ग्रामपंचायत अंतर्गत सोनारटोला येथे नक्षल ग्रस्त भागाचा विशेष कृती अंतर्गत खडीकरण रस्ता बांधकामाच्या ई-निविदा काढल्या होत्या. २९ सप्टेंबर २०१६ रोजी सदर ई-निविदा उघडण्यात आल्या. त्यात हिरामन केशोराव बावणकर यांना बांधकामाचे साहित्य पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. यासंदर्भात सरपंच व सचिवाने निविदा मंजूर झाल्याचे पत्र देवून साहित्य पुरवठा करण्याचे आदेश दिले. ३० सप्टेंबर २०१६ पासून बांधकामासाठी लागणारे साहित्य हिरामन बावनकर यांनी पुरविले. परंतु सरपंच व सचिवाने कोरे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सच्या नावाने काढण्यात आले. माझ्या साहित्याचे पैसे मला देण्यात यावे, मला दोन दिवसात पैसे न मिळाल्यास जिल्हा परिषदच्या इमारतीवरुन उडी घेवून आत्महत्या करणार असा इशारा हिरामन बावनकर यांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
देवाटोला येथे कार्यरत सचिवाने सावली येथे असताना मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार केल्याचाही आरोप होत आहे. देवाटोला येथील मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही यावेळी होत असून मुकाअ यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी आहे.