विकास आराखडा मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:26 PM2017-12-27T22:26:27+5:302017-12-27T22:26:40+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांचा ५० कोटींचा आराखडा १६ जानेवारीपर्यंत मंजूर करा. अन्यथा १७ जानेवारीपासून प्रवेशबंदी करून भिकमांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवेगावबांध फाऊंडेशनने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांचा ५० कोटींचा आराखडा १६ जानेवारीपर्यंत मंजूर करा. अन्यथा १७ जानेवारीपासून प्रवेशबंदी करून भिकमांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवेगावबांध फाऊंडेशनने दिला आहे.
नवेगावबांध फाऊंडेशनने ३१ डिसेंबरपर्यंत विकास आराखडा पूर्ण करावा, असा इशारा तीन महिन्यांपूर्वी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री राजकुमार बडोले, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना दिला होता. परंतु शासनाकडून याबाबत कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे फाऊंडेशनने आंदोलन पुढे ढकलून १६ जानेवारी २०१८ पर्यंत ५० कोटींचा विकास आराखडा मंजूर करा अन्यथा अर्धनग्न भिकमांगो आंदोलन व लोकप्रतिनिधींना संकुल परिसरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसरातील हिलटॉप गार्डनमध्ये झालेल्या नवेगावबांध फाऊंडेशनच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी उपसरपंच रघुनाथ लांजेवार होते. बैठकीला फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, सचिव रामदास बोरकर, सरपंच अनिरुध्द शहारे, माजी जि.प. सदस्य विशाखा साखरे, ग्रामपंचायत सदस्य शितल राऊत, लीला सांगोळकर, सविता बडोले, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, अन्ना डोंगरवार, मुकचंद गुप्ता, दिलीप शिपानी, नामदेव डोंगरवार, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, राजू पालीवाल, मुकेश जायस्वाल, होमराज पुस्तोडे, खुशाल कापगते, सरपंच संजय खरवडे, सुदेश ठाकूर, नवल चांडक, मुन्ना शुक्ला, हिरासिंग गौतम, संदीप मोहबंशी आदी उपस्थित होते.
तीन महिन्यांपूर्वी फाऊंडेशनने लोकप्रतिनिधी, राज्य शासन व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते. मात्र अद्यापही राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसराच्या विकासासाठी ५० कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यासंदर्भात कोणतेही काम केले नाही. राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पालकमंत्री तथा स्थानिक आ. राजकुमार बडोले व जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासनापलीकडे ठोस असे काहीच केले नाही. याबाबत बैठकीत खेद व संताप व्यक्त करण्यात आला.
आतापर्यंत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी अनेकदा बैठकी झाल्या. परंतु आश्वासन व बैठकीच्या पुढे विकासाची गाडी जात नाही. २० जुलैच्या प्रत्यक्ष पाहणीत ५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र प्रस्तावही तयार झाला नाही व विकास कामांना सुरुवातही झाली नाही. याबाबत फाऊंडेशनच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
नवेगावबांध फाऊंडेशनतर्फे अर्धनग्न भिक मांगो आंदोलन करुन जमा झालेला निधी मुख्यमंत्र्यांना पाठवून संकुल परिसराचा विकास करा, अशी मागणी करण्यात येणार आहे. असेही असे बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला फाऊंडेशनचे तालुक्यातील सदस्य, परिसरातील नागरिक व स्थानिक गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
आंदोलन ढकलले पुढे
५० कोटींचा निधी असल्याने शासकीय नियोजन करायला जास्त कालावधी लागतो. त्यामुळे थोडा आणखी कालावधी द्यावा, असे मत काही जेष्ठ सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे संकुल परिसराच्या विकासासाठी भिक मांगो आंदोलन व लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी आंदोलन १६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.