जिल्हयात कोरोना मृतांचा ग्राफ चढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:36+5:302021-03-09T04:32:36+5:30
गोंदिया : अवघ्या राज्यात कोरोनाने आपले पाय पसरण्यास पुन्हा सुरुवात केली असून, तोेच प्रकार सध्या जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. ...
गोंदिया : अवघ्या राज्यात कोरोनाने आपले पाय पसरण्यास पुन्हा सुरुवात केली असून, तोेच प्रकार सध्या जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनामुळे जीव जाणाऱ्या रुग्णांचा ग्राफही चढताच आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात १८६ रुग्णांचा जीव घेतला असून, सोमवारी (दि. ८) त्यात आणखी एकाची भर पडल्याने आता मृतांची संख्या १८७ झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून, नागरिकांनी सतर्कतेने वागण्याची गरज आहे.
मध्यंतरी नियंत्रणात आलेला कोरोना आता पुन्हा फोफावू लागला आहे. यामुळेच राज्यातील काही जिल्ह्यात स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, काही ठिकाणी लॉकडाऊन करावे लागत आहे. अवघ्या राज्यातच आता कोरोनाचा कहर वाढला असून, हीच स्थिती जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात मध्यंतरी मोजके रुग्ण निघत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटू लागले होते. मात्र, हा भ्रम खोटा ठरला व कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच, दररोजची बाधितांची आकडेवारी सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. यापेक्षा धोकादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील मृतांचा ग्राफ चढताच दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८६ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला असून, त्यात सोमवारी (दि. ८) आणखी एकाची भर पडली. परिणामी मृतांची एकूण संख्या १८७ झाली असून, हा प्रकार धोकादायक आहे.
--------------------------...
...अन्यथा कठोर पावलांची गरज
फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. सोबतच जिल्ह्यातही बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक बिनधास्तपणे वागत असून, त्यांच्या मनातून कोरोनाची भीती निघून गेल्याचे दिसते. तेथेच दुसरीकडे मृतांची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. अशात आता तरी नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारे कठोर पावले तेथील प्रशासनाला उचलावी लागत आहेत. तीच स्थिती जिल्ह्यात निर्माण होण्यापासून वाचता येणार नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.