कोरोना बाधितांचा आलेख होतोय डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:46+5:302021-06-04T04:22:46+5:30
गोंदिया : मागील महिन्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली, तर जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने ...
गोंदिया : मागील महिन्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली, तर जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने डाऊन होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी (दि. ३) जिल्ह्यात ६३ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मागील दोन दिवसांपासून एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेटसुध्दा कमी होत आहे. त्यामुळेच निर्बंध शिथिल करण्यात आले असून, उद्योग आणि व्यवसायांची गाडी रुळावर येत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी जिल्हावासीयांना पूर्वीइतकीच काळजी घेण्याची गरज आहे. तरच कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार करण्यात यश येईल. त्यामुळे जिल्हावासीयांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १६८४०६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,४२,९९७ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत १,६१,५२५ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,४०,५६२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,८४५ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ३९,८३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३२३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ५९० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.................
१,९३४ नमुन्यांची चाचणी ४५ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ७३९ जणांची आरटीपीसीआर, तर १,१९५ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. एकूण १,९३४ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर ४५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३२ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असल्याचे चित्र आहे.
............
२ लाख ६१ हजार ३४५ नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १४० केंद्रांवरून आतापर्यंत २ लाख ६१,३४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर जवळपास साडेसात लाख नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे.