रुग्णवाढीचा आलेख होतोय अप-डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:56+5:302021-05-13T04:29:56+5:30
गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत कधी वाढ, तर कधी घट होत असल्याचे चित्र आहे. मात्र, रुग्णवाढीचा आलेख जरी ...
गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत कधी वाढ, तर कधी घट होत असल्याचे चित्र आहे. मात्र, रुग्णवाढीचा आलेख जरी अप-डाऊन होत असला बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची एकूण संख्या अधिक असल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. रुग्णवाढीचा आलेख वर-खाली होत असल्याने कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसून जिल्हावासीयांना अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
बुधवारी (दि.१२) जिल्ह्यातील ५७२ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ६२६ रुग्णांमध्ये सर्वाधिक २२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४१, गोरेगाव ३४, आमगाव ९०, सालेकसा ४४, देवरी ६६, सडक अर्जुनी २८, अर्जुनी मोरगाव १०१ आणि बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १४०९८१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११७१७१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १४३७५३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२३३६८ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ३८६७२ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ३४००५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४०५१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ११७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
................
ग्रामीण भागात वाढतोय शिरकाव
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा शिरकाव झाला नव्हता. ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा बरीच काळजी घेतली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत दुर्लक्ष केले. ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरी भागासह ग्रामीणमध्येसुद्धा सक्रिय रुग्णांची संख्या २ हजारांवर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
................
मृत्यूचे सत्र सुरूच
कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. त्यामुळेच कोरोनाने मृृत्यू झालेल्यांचा आकडा ६२६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३६५ बाधितांचे मृत्यू यंदा एप्रिल महिन्यात झाले आहेत. दररोज ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे.
...............