कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:31+5:302021-04-26T04:26:31+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आठ दिवसांच्या कालावधीत ५१९८ कोरोनाबाधितांनी ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आठ दिवसांच्या कालावधीत ५१९८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ७६.४० वर पोहोचला आहे. एकंदरीत, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
जिल्ह्यात रविवारी (दि. २५) ६१६ बाधितांनी कोरोनावर मात केली; तर ६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ८७, गोरेगाव ४२, आमगाव ५४, सालेकसा ८, देवरी १४, सडक अर्जुनी २४, अर्जुनी मोरगाव ८९ आणि बाहेरील राज्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचणी शिबिर घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १३०४३५ जणांचे स्रावनमुने तपासण्यात आले. त्यांपैकी १०५८१८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १२८८८५ नमुने तपासणी करण्यात आले. त्यांपैकी १११५७६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०२७८ कोरोनाबाधित आढळले आहे. यांपैकी २३२५८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६५५३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत; तर ५८३८ स्रावनमुन्याचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
.......
आतापर्यंत ४६७ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत ४६७ कोरोना बाधितांचा मृत्त्यू झाला आहे. यात मागील आठ दिवसांच्या कालावधीत १२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हे एप्रिल महिन्यात झाले असून, मागील वर्षी सप्टेंबर महिन्याचे रेकार्ड मोडले आहे.
...........
एक लाख ४५ हजार नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात काेविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत एकूण एक लाख ४५५२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत कोवॅक्सिन लसीचे ११०० डोस शिल्लक असून कोविशिल्ड लसीचा साठा संपला असून, येत्या दोन-तीन दिवसांत तो येणार असल्याची माहिती आहे.