गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगडावर उसळला भक्तांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:50 PM2018-02-13T17:50:25+5:302018-02-13T17:51:16+5:30
हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविकांनी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालकांनी ‘महादेवा जातो गा’ चा गजर करीत भाविकांनी गर्दी केली होती. ही यात्रा पाच दिवस चालणार असल्याने येथील गर्दीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
महाशिवरात्री पर्वावर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मोठी यात्रा भरते. मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधूभाव वाढविणाºया या उत्सवाला येथे अत्याधिक महत्व व श्रध्दा आहे. हिंदू समाजबांधव महादेव पहाडीवर तर मुस्लिम बांधव ख्वाजा उस्मान गनी हारुनी बाबांचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतात. हातात त्रिशूल व मुखात महादेवा जातो गा असा गजर करीत सोमवारपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली होती. यावर्षी यात्रेवर निसर्ग कोपला, वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे व वातावरण ढगाळ असल्याने यात्रेपूर्वी होणाऱ्या गर्दीत भाविकांच्या संख्येत थोडीफार घट झाल्याचे चित्र होते. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने यात्रास्थळी वाहतुकीवर निर्बंध घातल्याने वाहनांची गर्दी कमी होती मात्र गावाबाहेर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. प्रतापगड गावाच्या सभोवताल तीन ठिकाणी गावाबाहेरच वाहतूक अडविण्यात आली होती. एस. टी. महामंडळाच्या बसेस व इतर वाहने लांब अंतरावर थांबविण्यात आल्याने भाविकांना बरीच पायपीट करावी लागली. प्रतापगड येथील समाज मंदिरालगत खा. प्रफुल पटेल यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. माजी खा. नाना पटोले यांनी या स्थळापासून सुमारे एक कि.मी अंतरावर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. महाप्रसादांच्या ठिकाणी ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावरुन भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात होते. महादेवाची गाणी उद्घोषकांद्वारे वारंवार कानावर ऐकू येत होत्या. अगदी सुरुवातीपासून तर दर्शन घेईपर्यंत केवळ ध्वनी कल्लोळच ऐकू येत होता. काही भाविकांनी या प्रसंगाला राजकीय स्पर्धा ही बिरुदावली दिली.
चोख बंदोबस्त
पोलीस प्रशासनाच्या वतीने कालीमाटी-प्रतापगड, कढोली-प्रतापगड व तिबेट कॅम्प-प्रतापगड मार्गावर गावाच्या सीमेबाहेर वाहने थांबविण्यात आल्याने भाविकांची थोडीफार गैरसोय झाली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा योग्य निर्णय होता. यावेळी भक्तनिवासानजीक स्त्री-पुरुषांकरीता स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शौचालयाची स्वच्छता व पाण्याच्या सुविधेसाठी येथे एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी तात्पुरत्या मुतारींची व्यवस्था करण्यात आली होती.
ग्रामपंचायतकडून सोयी सुविधा
भाविक रस्त्यावर नारळ फोडतात. कवच तसेच रस्त्यावर फेकतात ते इतर भाविकांच्या त्रासदायक ठरुन इजा होऊ नये, तसेच अगरबत्ती, बेल, फुल व कापूर जाळण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनातर्फे पहिली पायरी व वरच्या मंदिरात देवकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती.वरच्या मंदिरात दर्शन घेणारे व दर्शन घेऊन परत येणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती.
शिबिराची व्यवस्था
आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी ८ ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राऊत यांचे देखरेखीखाली आरोग्य तपासणी केंद्र व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणी पेयजल व्यवस्था तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तालुका प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेºयाची व्यवस्था करण्यात आली. एस.टी. महामंडळाच्या भंडारा, साकोली, गोंदिया व तिरोडा बसस्थानकावरुन भाविकांची वाहतूक सुविधा करुन देण्यात आली होती.