२० वर्षानंतर गोंदिया जिल्ह्यात आढळले ग्रेटर फ्लेमिंगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:42 PM2020-07-02T13:42:59+5:302020-07-02T13:44:33+5:30
मागील २० वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दिसलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी बुधवारी (दि.१) प्रथमच सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदायक बातमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील जैवविविधता धोक्यात येत आहे. मात्र या जैवविविधतेला टिकविण्यासाठी वन्यजीवप्रेमी पुढे येत असल्यामुळे पशू, पक्षी यांची संख्या स्थिर आहे.स्थलांतरीत पक्षीही जिल्ह्यात दाखल होतात. मागील २० वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दिसलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी बुधवारी (दि.१) प्रथमच सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदायक बातमी आहे.
जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात विदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि पक्षी मित्रांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. जिल्ह्यातील जैवविविधा कायम राहावी यासाठी जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी संस्था प्रयत्नरत आहेत. त्यातूच जिल्ह्यात सारस संवर्धन केले जात असल्याने सारस पक्ष्यांच्या संख्येतसुध्दा वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्याला सारसांचा जिल्हा अशी एक नवीन ओळख प्राप्त होवू लागली आहे. १ जुलैला तब्बल ३४ संख्या असलेले ग्रेटर फ्लेमिंगो नागरिकांना पाहायला मिळाले.
२० वर्षाआधी त्याच तलावात दोन ग्रेटर फ्लेमिंगो दिसल्याची नोंद आहे. स्थलांतर करताना एक-दोन दिवसासाठी मध्ये मुक्काम करतात. अन्न आणि आराम करण्यासाठी ते सौंदडच्या तलावात थांबले आहेत. साधारणत: पाकिस्तानचा सिंध प्रांतात, नेपाळचा तराई भाग, बांग्लादेश, श्रीलंका येथे स्थलांतर करतात. त्यानंतर गुजरातच्या कच्छ भागात सप्टेंबर ते आॅक्टोबर व मार्च ते एप्रिल या काळात विन (अंडी) घालतात. ग्रेटर फ्लेमिंगो (मोठा समुद्र राघू) चे गोंदिया जिल्ह्यात दर्शन होणे ही बाब गोंदिया जिल्ह्यातील जैवविविधतेला पोषक आहे.