२० गावांतील नळ योजनांना ग्रीन सिग्नल
By admin | Published: July 21, 2014 11:55 PM2014-07-21T23:55:19+5:302014-07-21T23:55:19+5:30
ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता
गोंदिया : ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीच्या सभेत हि मंजूरी देण्यात आली आहे. या योजनांची अंदाजपत्रकीय किंमत १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपये एवढी आहे.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. गावांत नळ पाणी पुरवठा योजना नसल्याने हातपंप, विहीरी किंवा अन्य जलस्त्रोतांमधून नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजार फोफावतात व कधी तर काहींना जीव गमवावा लागतो अशी स्थिती असते. अशात गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मिळावी अशी प्रत्येक गावकऱ्यांची मागणी असते.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजने मार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१३-१४-१५ मधील कृती आराखड्यात ग्रामीण भागातून नळ पाणी पुरवठा योजनांची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने नुकतीच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेत हा विषय मांडण्यात आला. यावर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा उदात्त हेतू पुढे ठेऊन अध्यक्षांनी २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली.
मंजूरी देण्यात आलेल्या योजनांमध्ये गोंदिया तालुक्यातील बनाथर, मोरवाही, नवरगाव कला, बटाना, डोंगरगाव, मुंडीपार, धानमगाव, मजितपूर, गिरोला, चुटीया, बिरसोला, रापेवाडा, गोरेगाव तालुक्यातील सर्वाटोला, तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, सेजगाव, भजेपार, काचेवानी, सालेकसा तालुक्यातील गिरोला, आमगाव तालुक्यातील महारीटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी या गावातील योजनांचा समावेश आहे. या योजनांचे १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपयांचे अंदाजपत्रक असून लवकरच या योजनेची कामे पूर्ण होतील असे अध्यक्षांनी कळविले आहे.
(शहर प्रतिनिधी)