वर्ग १ ते ७ वी च्या शाळा सुरू करण्यास ‘ग्रीन सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 05:00 AM2022-02-12T05:00:00+5:302022-02-12T05:00:03+5:30
आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सोमवारपासून (दि.१४) जिल्ह्यात वर्ग पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राजेश खवले यांनी घेतला आहे; परंतु कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहे. त्यांतर्गत, शाळा दररोज ३ ते ४ तास घेण्यात यावी, पटसंख्या अधिक असलेल्या शाळांनी १ दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत इयत्ता १ ते ७ वीच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याने वर्ग १ ते ६ पर्यंतच्या शाळा सोमवारपासून (दि.१४) फेब्रुवारीपासून सुरू करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे.
जिल्ह्यात ८ वी ते १२ वी चे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा अद्याप बंद आहेत. विशेष म्हणजे, अन्य जिल्ह्यांत शाळा सुरू झालेल्या आहेत. अशात आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सोमवारपासून (दि.१४) जिल्ह्यात वर्ग पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राजेश खवले यांनी घेतला आहे; परंतु कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहे. त्यांतर्गत, शाळा दररोज ३ ते ४ तास घेण्यात यावी, पटसंख्या अधिक असलेल्या शाळांनी १ दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे. ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑफलाईन व उरलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाळी-पाळीने शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालकांकडून त्यांच्या पाल्यांना शाळेत येण्यासंबंधाने संमतिपत्र लिहून द्यावे लागणार आहे.
सर्वांना मास्क आवश्यक
- सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याला ताप आणि उलटी येत असेल तर त्वरित कोविड तपासणी करणे बंधनकारक राहील. मैदानातील खेळ, स्नेहसंमेलन, परिपाठ यासारखे गर्दीचे कार्यक्रम खुल्या जागेच्या ठिकाणी २५ टक्के व बंदिस्त सभागृहात आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने कोविड नियमावलीचे पालन करून आयोजित करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप असल्यास शाळेत येण्यास सक्ती करण्यात करता येणार नाही.
लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
- सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा स्तरावर काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅण्डवॉश स्टेशन उभारायचे असून विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करण्याबाबत सूचना द्यायच्या आहेत. हात धुण्याकरिता साबण उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता नेहमी पाळण्यास आवाहन करायचे आहे. विद्यार्थ्यांनी सोबत पाणी बॉटल आणावी लागेल.