कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:25 AM2018-07-07T00:25:26+5:302018-07-07T00:26:45+5:30
पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले. उद्घाटन जि.प. महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते, पं.स. उपसभापती दिलीप वाघमारे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. अतिथी म्हणून जि.प. सदस्य दुर्गा तिराले, माजी पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, पं.स. कृषी अधिकारी एम.के. मडामे, मंडळ कृषी अधिकारी एस.व्ही. भोसले, कृषी विस्तार अधिकारी श्रीकांत कन्नाके, लोकमत तालुका प्रतिनिधी विजय मानकर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आली. मान्यवरांनी वसंतराव नाईक यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील अमूल्य कार्याबद्दलची माहिती दिली. तसेच कृषीदिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगितला. वसंतराव नाईक यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदी सर्वात जास्त कालावधीत आणि आपल्या ऐतिहासिक कामाचा ठसा उमटविला, असेही सांगितले.
त्याचप्रमाणे शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीबाबतही माहिती देण्यात आली. कृषीविषयक इतर बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान सालेकसा तालुक्याची हरित क्रांतीकडे वाटचाल या शीर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आलेल्या लोकमत समृद्ध वाटचाल पुरवणीचे प्रकाशनसुद्धा या वेळी करण्यात आले. सदर पुरवणीत तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती प्रकाशित केल्याबद्दल लोकमत वृत्तपत्राचे तसेच लोकमत तालुका प्रतिनिधी विजय मानकर आणि इतर वार्ताहरांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी, कृषीमित्र, पत्रकार, ग्रामसेवक, कृषी सहायक व पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ए.एस. उपवंशी यांनी केले. आभार ग्रामसेवक एन.जी. राठोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.आर. भगत, डी.एस. तुरकर, एस.के. गणवीर, आर.बी. कोटवार, एस.टी. नागदेवे, आर.एम. कागदीमेश्राम, ए.एस. पवार, झेड.एम. कांबळे, देवराव भदाडे आदिंनी सहकार्य केले.