तरुण पिढीभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:38+5:302021-03-24T04:27:38+5:30
गोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य पथकाने वर्तविला आहे. लगतच्या जिल्ह्यांमध्येसुध्दा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ...
गोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य पथकाने वर्तविला आहे. लगतच्या जिल्ह्यांमध्येसुध्दा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत युवकवर्गाला कोरोनाची फारशी लागण झाली नव्हती. मात्र, दुसऱ्या लाटेत २० ते ३० वयोगटातील तरुणांभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे. तर १ ते १० वयोगटातील २७ जण कोरोना बाधित असल्याची बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव वाढला. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३० वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्केच्या वर असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनाचा मृत्यू दर कमी असल्याने ही समाधानकारक बाब आहे. युवावर्गाला कोरोनाची लागण होत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा संसर्गात पुन्हा वाढ होऊ शकते.
...................
मृतकांमध्ये ४० ते ६० वर्षांवरील व्यक्तिंचा समावेश
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पण, मृत्यूदर आटोक्यात असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८७ कोरोना बाधितांचा समावेश असून, यात ४० ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तिंचा समावेश आहे. मृतकांमध्ये युवकांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. गोंदिया जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यू दर १.२० टक्के आहे.
......
कोट :
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हावासीयांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २० ते ३० वयोगटातील कोराेना बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
- डाॅ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
...........
१२ वर्षांखालील रुग्ण : २७
१२ ते १८ वर्षे : १४०
१९ ते ३५ वर्षे : २८०
३६ ते ५० वर्षे : २००
५० पेक्षा जास्त : २०५