जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढतोय ग्राफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:01+5:30
जिल्ह्यात अजूनही बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून नागरिकांचे येणे सुरूच आहे. तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक नागरिक रोजगारासाठी दुबई येथे गेले आहेत. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ते सुध्दा आपल्या स्वगृही परतत आहे. सोमवारी आढळलेल्या एकूण १६ कोरोना बाधितांमध्ये ८ विदेशातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (दि.६) पुन्हा १६ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ६६ वर पोहचला आहे. कोरोना बाधितांचा ग्राफ वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. मात्र १० कोरोना बाधित कोरानामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला.
जिल्ह्यात अजूनही बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून नागरिकांचे येणे सुरूच आहे. तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक नागरिक रोजगारासाठी दुबई येथे गेले आहेत. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ते सुध्दा आपल्या स्वगृही परतत आहे. सोमवारी आढळलेल्या एकूण १६ कोरोना बाधितांमध्ये ८ विदेशातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. तर पाच गोंदिया तालुक्यातील आणि तिरोडा,अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तिरोडा येथे सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा वकील असून तो तिरोडा न्यायालयाशी निगडीत होता. त्यामुळे तिरोडा येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये सुध्दा खळबळ उडाली असून येथील कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयाच्या अधिकाºयांनी दिली. कोरोनाचा हॉट स्पॉट होत चाललेल्या कुंभारेनगर येथे पुन्हा ३ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या १६ वर पोहचली आहे. शहरालगत असलेल्या फुलचूरपेठ येथे सुध्दा सोमवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष मागील पाच दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात ५० हून अधिक कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ वाढत असल्याने जिल्ह्यावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सोमवारी १० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली आहे. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या स्थितीत ६६ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
विदेशातून येणाºयांनी वाढविली चिंता
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४०६६ स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १६७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ३८९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर २४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ
सोमवारी जिल्ह्यात पुन्हा १६ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे पूर्वी असलेल्या १३ कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ कंटेन्मेंट झोन आहे. सोमवारी सालेकसा, गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये स्थानिक प्रशासनाने वाढ केली.
स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४२७७ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी १८३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ४०९८नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर २७७ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी सांगितले.