ग्रामपंचायत क्षेत्रात गृहकर वाढणार
By admin | Published: February 20, 2016 02:48 AM2016-02-20T02:48:56+5:302016-02-20T02:48:56+5:30
भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत असलेल्या गावात यावर्षीपासून प्रथमच नवीन कर आकारणी सुरु होणार आहे.
कोंढा (कोसरा) : भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत असलेल्या गावात यावर्षीपासून प्रथमच नवीन कर आकारणी सुरु होणार आहे. इमारतीचे भांडवली मूल्य ठरवून कर ठरविले जात आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतीची कर वसुली शुन्य आहे. अशावेळी ग्रामपंचायतीची मार्च अखेर वसुली एक टक्काही झाली नाही. नागरिक मात्र प्रत्येक गावात इमारत कर वाढणार म्हणून धास्तावले आहेत असे चित्र आहे.
ग्रामपंचायत असलेल्या क्षेत्रात जागेच्या क्षेत्रफळानुसार गृहकर आकारणी केली जात असे. मात्र या गृहकर आकारणीच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकेची सुनावणी डिसेंबरमध्ये झाल्यानंतर उच्च न्यायालयाने इमारतीचे भांडवली मुल्य ठरवून कर आकारण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानुसार शासनाने ३१ डिसेंबरला ग्रामविकास व जलसंधारण विभागाने अधिसूचना काढून इमारती व खाली जागेचे भांडवली मुल्य काढून इमारत कर आकारणी करण्यास सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना त्यानुसार सूचना दिली आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या, खंडातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळा घेऊन इमारतीचे कर कसे आकारायचे ते सांगितले.
सध्या सर्व ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक व इतर ग्रा.पं. चे कर्मचारी जानेवारी महिन्यापासून नवीन कर आकारण्याच्या कामात व्यस्त आहेत. इमारती किंवा खाली जागेवर कर बसविण्यासाठी राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार होत आहे. कर भरणारा घरमालक, भाडेधारकास कर आकारणी करावयाचे प्रपत्र भरून द्यावे लागणार आहे.
धार्मिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या व जेथे प्रार्थना होते. त्यावर कर आकारणी केली जाणार नाही. पण मंदिराला लागून असलेले पुजाऱ्याचे निवासस्थान, कार्यालय व धार्मिक स्थळाचे व्यवसायीक गाळे यांच्यावर कर आकारणी केली जाणार आहे. शाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा कार्यालय, क्रीडांगण, वसतिगृह कर्मचारी निवासस्थान उपहारगृह यांच्यावर देखील कर आकारण्यात येणार आहे. संरक्षण दलात शौर्यपदक किंवा सेवापदक धारक माजी सैनिक किंवा माजी सैनिकांची विधवा यांना एका इमारतीवर करातून माफी असणार आहे. पण त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागेल.
भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये कर आकारणी समिती गठीत करण्यात आली आहे. सरपंच अध्यक्ष, उपसरपंच सदस्य, विस्तार अधिकारी (पंचायत) सदस्य, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) आणि सदस्य सचिव ग्रामसेवक किंवा सचिव हे आहेत. ही समिती शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कर आकारणी करून अंतिम यादी तयार करीत आहे. या समितीवर नियंत्रण ठेवणारी तालुकास्तरावर संनियंत्रण समिती गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेत स्थापन केली आहे. हे सर्व कामे सुरु असल्याने सध् या ग्रामपंचायतला एकही घरकर मिळाले नाही. म्हणून ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती डबघाईस आल्या आहेत. वीज, पाणीपुरवठा योजना बिल भरण्यास ग्रामपंचायतकडे एकही निधी नाही. अशावेळी नवीन दराने आकारणी केल्यानंतर नागरिकांना देखील कर आकारणी मान्य होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पवनी तालुक्यातील चौरास भागातील प्रत्येक गावात नवीन कर आकारणीचा नागरिकांनी धास्ती घेतली आहे. कर दीड, दुपटीने वाढले तर गृहकर कसे भरायचे असा प्रश्न गरीबांना पडला आहे. ज्यांच्याजवळ घर बांधण्यास पैसे नाही. अशांना शासन घरकुल मंजूर करते. आर्थिकदृष्ट्या मागास घरकुलात राहणारे गरीबांना घर कर भरताना मोठी कसरत करावी लागणार आहे. नवीन कर आकारणीमुळे ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले आहेत. (वार्ताहर)