शिक्षकांच्या अपडाऊनवर गाजली पालक सभा
By admin | Published: August 26, 2014 12:04 AM2014-08-26T00:04:48+5:302014-08-26T00:04:48+5:30
येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक-पालक संघाची सभा शनिवारी पार पडली. मात्र या सभेत पालकांनी शिक्षकांच्या अपडाऊनचा विषय छेडून सभा गाजविली. या सभेत विविध
पांढरी : येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक-पालक संघाची सभा शनिवारी पार पडली. मात्र या सभेत पालकांनी शिक्षकांच्या अपडाऊनचा विषय छेडून सभा गाजविली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के.जी. परशुरामकर होते. पालक संघाच्या सभेत मोठ्या प्रमाणात पालक वर्गांने हजेरी लावली होती. सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सल्लू पठान यांनी शाळेतील शिक्षक प्रार्थनेच्या वेळेत हजर राहात नसून उशिरा येत असल्याचा विषय मांडला. त्याचप्रकारे मध्यांतरच्या सुटीमध्ये येथील काही शिक्षक रेल्वे स्टेशनवर फिरताना दिसत असल्याचा विषय मांडत अशांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
यावर सभेला उपस्थित काही पालकांनी शिक्षक अपडाऊन करीत असल्याचा विषय छेडला. कारण या शाळेत अंदाजे २० ते २४ कर्मचारी असून रोज साकोली, सडक/अर्जुनी, गोंदियावरुन उपडाऊन करित आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम जाणवत असल्याचे मत पालकांनी मांडले.
एवढेच नाही तर शिक्षक या भागात राहत नसतानाही मुख्यालयी राहण्याचा दाखला घेत असतात व त्याचा फायदा घेत असल्याचाही प्रकार पालकांनी उघडकीस आणला. हा गंभीर विषय असून असले प्रकार खपवून न घेता संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी व मुख्यालयी राहणे अनिवार्य करावे अशी मागणी केली.
या शाळेत ५ ते १२ वी पर्यंत वर्ग असून सुमारे एक हजार ते बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षकांच्या अशा या वागणुकीमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक गंभीर असून त्यांचा हा रोष या सभेत दिसून आला. यामुळेच पालकांनी ही सभा गाजवून सोडली. सभेचे संचालन विजय बिसेन यांनी केले. आभार नाकाडे यांनी मानले. (वार्ताहर)