पालकमंत्री व खासदारांनी घेतला डॉक्टरांचा ‘क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:18+5:30
‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधत गंगाबाईचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. खासदार मेंढे यांनी रविवारी (दि.३) चक्क गंगाबाई स्त्री रूग्णालय गाठले व ‘लोकमत’ वृत्तपत्र समोर ठेवून तेथील एक-एक बाबी टिपून डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्या. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडे यांच्यासह गंगाबाईत सद्धा कार्यरत असलेले डॉक्टर तिथे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय हे गर्भवतींसाठी वरदान ठरण्यापेक्षा आता अभिशाप ठरण्याच्या मार्गावर आहे. मागील चार दिवसांपासून रूग्णालयातील प्रसूती बंद असल्याने ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला. याची दखल घेत रविवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके व खासदार सुनील मेंढे यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा क्लास घेतला.
१ नोव्हेंबरपासून डॉक्टर सेवा देण्यास राजी नसल्यामुळे तसेच डॉक्टरांची पदे रिक्त असल्याचे सांगून १ नोव्हेंबर पासून प्रसूती बंद करण्यात आली. ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधत गंगाबाईचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. खासदार मेंढे यांनी रविवारी (दि.३) चक्क गंगाबाई स्त्री रूग्णालय गाठले व ‘लोकमत’ वृत्तपत्र समोर ठेवून तेथील एक-एक बाबी टिपून डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्या. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडे यांच्यासह गंगाबाईत सद्धा कार्यरत असलेले डॉक्टर तिथे उपस्थित होते. त्यातच पालकमंत्री फुके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून गंगाबाईचे प्रश्न ऐकून ते कसे सोडविले जातील यावरच चर्चा करण्यात आली.
केटीएस अधिनस्त असलेल्या गंगाबाईचा कारभार आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून चालत आहे. वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या उदासिनतेमुळे गंगाबाईत रूग्णांना दाखल करण्यास डॉक्टर मनाई करीत आहेत. मेडीकल कॉलेजकडे गंगाबाईचा कारभार आला तेव्हापासून गंगाबाईचा विकास किती केला याची माहिती पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांना मागितली. तर खासदारांनी रूग्णांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनी काय हवे ते सांगा मात्र समस्या सोडवा अशी तंबी दिली. १४ लाख लोकसंख्येसाठी असलेल्या एकमेव गंगाबाईत प्रसूती करणे चार दिवसांपासून बंद असल्याने मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. लहाने व नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल दाखल झाले. त्यांनीही गंगाबाईचा आढावा घेतला. त्याचप्रकारे आमदार विनोद अग्रवाल यांनी डॉ. लहाने व डॉ. जायस्वाल यांच्या सोबत चर्चा करून रूग्णालयातील सेवा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
खासदारांच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते गज्जू फुंडे, अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, अधीक्षक डॉ.सुवर्णा हुबेकर, शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. राजश्री पाटील, डॉ.गरिमा बग्गा उपस्थित होते.
गंगाबाईला तीन कोटी मिळणार
गंगाबाईतील समस्या निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीतून तीन कोटी रूपये देण्याची तयारी पालकमंत्री डॉ. फुके यांनी दर्शविली. औषधे व इतर साहीत्य खरेदी करून सेवा सुरळीत करण्यासाठी लागणारा निधी म्हणून तीन कोटी रूपये जिल्हा नियोजन निधीतून देणार असल्याचे सांगितले.
सहा डॉक्टरांची पर्र्यायी व्यवस्था
पालकमंत्र्यांनी फटकारल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रु खमोडे यांनी सोमवारी (दि.४) प्रसूती सेवा बहाल करण्यासाठी सहा डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ. सायास केंद्रे, डॉ. आशा अग्रवाल, डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. राजश्री पाटील, डॉ. गरिमा बग्गा, व डॉ. सविता वडेरा यांना पाठविले. हे सर्व डॉक्टर आठ-आठ तासांची नोकरी करणार असे सांगण्यात आले.
चवथ्या दिवशीही प्रसूती बंदच
पालकमंत्री व वैद्यकीय संचालक यांनी फटकारल्यानंतर सहा डॉक्टरांची नियुक्ती करतो म्हणून गाजावाजा करण्यात आला. डॉ. आशा अग्रवाल यांना सोमवारी (दि.४) आदेश मिळाले परिणामी त्यांनी लगेच कार्यभार सांभाळला. परंतु त्यांच्या मदतीला कुणीच डॉक्टर नसल्यामुळे सोमवारी (दि.४) गंगाबाईत प्रसूती होऊ शकली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या आदेशावरूनही गंगाबाईत चवथ्या दिवशीही प्रसूती होऊ शकली नाही असे सांगण्यात आले.