पितृत्वाची उब देण्यासाठी पालकमंत्री धावून आले
By admin | Published: June 6, 2017 01:01 AM2017-06-06T01:01:23+5:302017-06-06T01:01:23+5:30
राज्याच्या केंद्रीय मंत्री पदाबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पाळत असताना त्यांच्यावर साहजिकच कामाचा मोठा आवाका असेल यात दुमत नाही.
‘त्या’ चार अनाथ मुलींच्या दारी भेट : शिक्षणाची होणार सोय, शासकीय मदतीसाठी पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : राज्याच्या केंद्रीय मंत्री पदाबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पाळत असताना त्यांच्यावर साहजिकच कामाचा मोठा आवाका असेल यात दुमत नाही. ज्यांच्या पिंडच सामाजिक दायित्वाचा असतो, त्यांना आपल्या मतदार संघातील दु:खामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचे मन हेलावून जाते. आपल्या कामाच्या व्यवस्थेत असून ‘त्या’ चार अनाथ मुलींच्या दारी भेट देण्याची किमया पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.
जन्मदात्या मायबापाचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या त्या ४ बहिणींना पितृत्वाची उब देवून रोख मदत देण्यासाठी खुद्द राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले धावून आले. सोमवार (दि.५) त्या अनाथांचे गाव निमगाव येथील घर गाठून त्यांनी अनाथ झालेल्या ४ बहिणींची मोठ्या आस्थेने विचारपूस करुन धीर दिला. त्यांनी आपल्याकडून रोख १० हजाराचा आर्थिक मदतीचा दिलासा दिल्याने त्या चारही बहिणींना आपलाही कुणी पाठीराखा उभा असल्याचा प्रत्यय या भेटीदरम्यान आला.
निमगाव -बोंडगावदेवी येथील अनिल सुदाम सूर्यवंशी (४०) हे पत्नी मंगला (३६) व खेळण्या-बाळगण्याच्या वयातील असलेल्या ४ मुलीसह गुण्यागोविंदाने आपला संसार चालवित होते. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी अनिल अर्जुनी मोरगाव येथे सलुनची दुकान चालवित होते. सुशील स्वभावाची काबाडकष्ट करणारी पत्नी लाभल्याने त्या दोघांसह ४ मुलींचा संसार हेवा वाटावा असा चालत होता. अशातच मागील एप्रिल महिन्यात अनिलची प्रकृती खालावली. नागपूर येथे औषधोपचार सुरू असताना एकाएकी २३ एप्रिल २०१७ रोजी अनिलने प्राण सोडले. पतीच्या निधनामुळे पत्नी मंगलावर मोठा वज्रघात घडून पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. आपल्या मुलींना जन्मदात्या बापाची कदापीही उणीव भासू देणार नाही, असा मनाशी पक्का विचार करुन त्या ४ लेकींशी सोबतीचे संघर्षमय जीवन जगण्याची खुणगाठ मनात बांधून कुंकुवाच्या धन्याचे दु:ख सावरत होती. पतीचे दु:ख विसरुन चार मुलींचा सांभाळ करणाऱ्या मंगलावर ध्यानीमनी नसताना नियतीने घाला घातला. पती निधनाच्या २५-२६ दिवसांनी एकाएकी मंगलाची प्रकृती बिघडली. १९ मेच्या दुपारी ३ वाजता औषधोपचार करण्यापूर्वी गोंडस ४ मुलींना सोडून देवाघरी निघून गेली.
एकाच महिन्यात जन्मदाते माता-पिता निघून गेल्याने त्या ४ मुलींवर अनाथ होण्याची पाळी आली. त्यांच्या पुढील भविष्याची काळजी कोण घेणार, ही मनाला हेलावणारी बातमी सर्वप्रथम ‘ लोकमत’ने दिली. अनेक ठिकाणावरुन मदतीचा ओघ आला. गावातील ग्रामपंचायत सदस्य तथा तालुका भाजयुमोचे अध्यक्ष संदीप कापगते यांनी ही बाब राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या नजरेत आणूण दिली. सूर्यवंशी कुटुंबावर झालेला आघात, अनाथ झालेल्या ४ बहिणींशी सांत्वना करुन त्यांना आधार देण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले आपल्या ताफ्यात त्या खोपडीवजा घरामध्ये राहणाऱ्या चार मुलींना भेटण्यासाठी सोमवारी आले. त्या चार बहिणींना जवळ घेवून मोठ्या आस्थेने विचारपूस केली. तुमच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ. शाळा सोडू नका. सर्व व्यवस्था करू. मुख्यमंत्री निधीतून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करुन शासनाच्या योजनाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भेटीप्रसंगी पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी त्यांनी त्या मुलींना नगदी १० हजाार रुपयाची आर्थिक मदत दिली. वेळोवेळी अडचण पडल्यास संपर्क साधत राहा, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. पालकमंत्र्यांच्या भेटीने त्या चारही बहिणींच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे क्षण दिसत होते. यावेळी सभापती अरविंद शिवणकर, रघुनाथ लांजेवार, विनोद नाकाडे, बीडीओ जमईवार, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, लायकराम भेंडारकर, संदीप कापगते, तहसीलदार बोंबार्डे, उमाकांत ढेंगे, होमराज ठाकरे इत्यादी उपस्थित होते.