पालकमंत्र्यांनी घेतला यंत्रणेकडून कोरोनाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:28 AM2021-04-15T04:28:20+5:302021-04-15T04:28:20+5:30
गोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ...
गोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पुरेसे बेड, ऑक्सिजनचा साठा आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरिक्त स्टॉक ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
पालकमंत्री मलिक यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी हाफकिन्स कंपनीला नवीन आरटीपीसीआर मशीनचे ऑर्डर देऊन आणि त्याचे पेमेंट केल्यानंतरही मशीनचा पुरवठा झाला नसल्याची बाब डॉ. तिरपुडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. यावर पालकमंत्र्यांनी त्वरित आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले, तसेच मेडिकलमध्ये मंजूर झालेले ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरु करण्याचे निर्देश दिले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. ऑक्सिजनपुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शनसह आवश्यक औैषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे, तसेच रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.
........
राजेंद्र जैन यांनी दिले निवेदन
माजी आ. राजेंद्र जैन व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात कोरोना चाचणीनंतर २४ तासांत अहवाल देण्यात यावा, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा व कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याची मागणी केली. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल हे औषध कंपन्यांशी चर्चा करीत असून, एक- दोन दिवसांत साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयात चांगली आरोग्य सेवा मिळावी याकडे लक्ष देण्याची मागणी केली, तसेच कोविड संक्रमण प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली.
.......
पालकमंत्री करणार लवकरच जिल्ह्याचा दौरा
पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, यादरम्यान ते व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून दररोज आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री नबाब मलिक यांनी सांगितले.