पाहुणे निघाले परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:10 AM2017-10-23T00:10:10+5:302017-10-23T00:10:31+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. तसेच येथून चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावतात.

Guests return on the return journey | पाहुणे निघाले परतीच्या प्रवासाला

पाहुणे निघाले परतीच्या प्रवासाला

googlenewsNext
ठळक मुद्देतिकिटांसाठी तासन्तास रांगेत : रेल्वेस्थानकावर खचाखच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. तसेच येथून चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावतात. शासकीय कर्मचाºयांच्या सध्या दिवाळी सुट्यांचे दिवस संपत आले आहेत. दिवाळीनिमित्त स्वगृही आलेले व पाहुणचारासाठी आलेले पाहुणे आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे गाड्या सध्या भरभरून चालत आहेत.
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा व भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस. शाळांना सुटी असल्याने विद्यार्थी सहकुटुंब नातलगांकडे जातात. शासकीय कर्मचाºयांना सुटी असल्यामुळे तेसुद्धा फिरण्यासाठी इतरत्र जातात. मात्र आता पाच दिवसांची दिवाळी संपण्याच्या मार्गावर असताना पाहुणे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यात मोडणाºया अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. गोंदिया रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. येथून बालाघाट-जबलपूर, रायपूर-बिलासपूर, चांदाफोर्ट-चंद्रपूर व नागपूर अशा चारही दिशांनी रेल्वेगाड्या धावतात. गोंदिया स्थानकातून आपल्या कोणत्याही गंतव्यस्थळी जाणे सुगम असते. त्यामुळे जिल्ह्यात आलेले अनेक गावांतील बहुतांश पाहुणे गोंदिया रेल्वे स्थानकातूनच आपला परतीचा प्रवास करतात.
यामुळे सद्यस्थितीत गोंदिया रेल्वे स्थानक गर्दीने खचाखच भरलेले दिसून येत आहे. येथील तिकीट काऊंटरवर लोकांची गर्दी उसळलेली दिसते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहून तिकिटे खरेदी करावी लागत आहेत. ट्रेन निघण्याची वेळ झाली असतानाही अनेकांना तिकिटे मिळत नाही, त्यांना रांगेतच राहून पुढील ट्रेनची तिकिटे घ्यावी लागत असल्याचे चित्र स्थानकावर दिसून येत आहे. तसेच दिवाळीत घरी आलेल्यांना परतीचा प्रवास करताना रेल्वे गाड्यांत आरक्षण मिळाले नाही.
परिणामी प्रवाशांना पुणे, मुंबईकडे जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. नोकरी, व्यवसाय, खासगी कामानिमित्त पुणे, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, सूरत आदी प्रमुख शहरात असलेल्यांनी दिवाळीत घर गाठले होते. घरी दिवाळी उत्सवाला जायचे म्हणून कसातरी प्रवास केला. मात्र दिवाळीनंतर परतीचा प्रवास फारच बिकट झाला आहे.
२३ आॅक्टोबर रोजी कार्यालयात रूजू व्हायचे असल्याने मिळेल त्या जागी प्रवास करण्याची अनेकांची तयारी पाहावयास मिळाली. रविवारी एक दोन तरी विशेष रेल्वे गाड्या सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतु रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या आशेवर पाणी फेरल्याचे दिसून आले. गत चार ते पाच दिवसांपासून रेल्वे आरक्षण खिडक्यांवर प्रचंड रांग, तरीदेखील क्षणात तात्काळचे आरक्षण अनेकांना न मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
काही जणांनी तीन ते चार महिन्यांपूर्वीच दिवाळीदरम्यान रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र ज्यांनी वेळेवर दिवाळीत घर गाठले त्यांना अनेक समस्यांचा सामना करून प्रवास करावा लागला आहे. रेल्वे तिकीट दलालांकडेही रविवारचे बोलू नका, हेच उत्तर प्रवाशांना मिळाले.

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावले
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बिलासपूर, औरंगाबादकडे जाणाºया प्रवाशांची उसळलेली गर्दी बघून खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवाशांच्या खिशावर अक्षरश: डल्ला मारला आहे. त्यांनी वाढीव प्रवासभाडे घेतल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या चालक-मालकांनी मोठी कमाई केली आहे. मात्र या प्रकाराने प्रवाशांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.
पाकिटमारांची भीती प्रवाशांना
रेल्वे व बस स्थानकावर गर्दीचा लाभ घेत पाकिटमारी करणारे असामाजिक तत्व सक्रीय झाले आहेत. याशिवाय महिलांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने लंपास करणाºया टोळ्यासुद्धा आहेत. प्रवाशांच्या सुटकेस व बॅग्स पळवून नेण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता दिवाळी संपण्याच्या मार्गावर असताना अतिथी परतीच्या प्रवासाला लागले असल्याने गोंदिया रेल्वे स्थानक गर्दीने खचाखच भरले आहे. त्यामुळे पाकिटमारांची भीती प्रवाशांना असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट खिडक्या ते सर्वच प्लॅटफॉर्मवर पोलीस संरक्षणाची सुविधा द्यावी, अशी चर्चा या प्रवाशांमध्ये आहे.

Web Title: Guests return on the return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.