शेतकऱ्यांना भात लागवडीवर मार्गदर्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:22+5:302021-06-24T04:20:22+5:30
गोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा ...
गोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा अंतर्गत ग्राम कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्र येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांना सहभाग व लागवड यावर मार्गदर्शन करण्यात आले.
उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कलेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी, भात रोपवाटिका कशी तयार करावी, भात लागवड तंत्रज्ञान वापरुन ड्रम सिडरने पेरणी कशी करावी, ॲझोला, गिरीपुष्प व युरिया ब्रिकेटसचा वापर कसा करावा, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्डचा वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तुमडाम यांनी, सुधारित पद्धतीने भात लागवड, श्री-पट्टा पद्धतीने भात लागवड कशी करावी व तुडतुड्याचे नियंत्रणावर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल माहिती दिली. खडसे यांनी, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी तयार केलेले कृषक ॲप कसे डाऊनलोड करावे व त्याचे फायदे काय आहेत याबाबत सांगितले. संचालन मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कलेवार यांनी केले.