काम करणाऱ्यांना निवडून देण्यासाठी मार्गदर्शन करा
By admin | Published: September 19, 2016 12:28 AM2016-09-19T00:28:41+5:302016-09-19T00:28:41+5:30
नगर परिषद निवडणुकीत नागरिकांनी प्रलोभन व जातीवादात पडून बहुतांश अकार्यक्षम व स्वार्थी उमेदवारांना निवडून नगर परिषदेत पाठविले.
गोंदिया : नगर परिषद निवडणुकीत नागरिकांनी प्रलोभन व जातीवादात पडून बहुतांश अकार्यक्षम व स्वार्थी उमेदवारांना निवडून नगर परिषदेत पाठविले. त्याचे परिणाम शहरातील रस्ते, बंद पडलेल्या नाल्या व स्वच्छतेवरून दिसत आहेत. प्रोफेसर कॉलनीतील शिक्षकांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे. आता मात्र या बुद्धीजीवींनी शहराच्या विकास व उज्वल भविष्यासाठी काम करणाऱ्या निस्वार्थ उमेदवारांना निवडून देण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
शहरातील कुडवा नाका स्थित प्रोफेसर कॉलनीतील सहा लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फक्त स्वार्थ सिद्धीसाठी लागले आहेत. अथक प्रयत्नांनंतर केंद्र शासनाने मंजूर केलेल्या भूमिगत गटार योजनेला फक्त मलाई मिळाली नाही म्हणून सुरू करण्यात आले नाही. मात्र आता शासनाच्या नव्या नियमांमुळे या योजनेचा ६५ कोटींचा निधी परत जाने निश्चीत आहे. शहरात नगर परिषदेने केलेल्या कामांचे होर्डींग दिसून येत आहेत. मात्र प्रत्यक्ष स्वरूपात ही कामे दिसून येत नसल्याचेही त्यांनी सांगीतले.
कांग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातून केलेली रिंग रोड नाला सिमेंटीकरण, पाण्याची निकासी व्हावी यासाठी दोन मोठे पुल, नवाउड्डाण पुल, शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज व अन्य विकास कामे दिसून येत आहेत. मात्र नगर परिषदेतील भाजपच्या कार्यकाळातील कामे नव्हे तर फक्त भ्रष्टाचारच दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. प्रभाकर गुप्ता यांनीही मत व्यक्त केले. प्रास्तावीक सेवानिवृत्त प्राध्यापक बी.पी.श्यामका यांनी मांडले. संचालन कॉंग्रेस महासचिव देवेंद्र अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमाला कॉंग्रेस शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक व्यंकट पाथरू, लोकेश रहांगडाले, प्रोफेसर कॉलनीचे अध्यक्ष एस.के.रायचौधरी, सचिव जे.पी.व्यास, कमल पाराशर, सुशिला अंबुले, एच.एच.पारधी, राजेश व्यास, प्रा.जफर खान, प्रा. अशोक हुकमानी, प्रा.अजय श्यामका, भावेश चव्हाण, आरिफ अंसारी, अहमर खान, अतूल शाह, भरत सिंग व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)