निसर्ग संवेदना शिबिरातून १५३ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:42 PM2018-03-19T21:42:12+5:302018-03-19T21:42:12+5:30
वनविभाग गोंदिया आणि वनपरिक्षेत्र गोठणगाव-अर्जुनी-मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन पार्क नवेगावबांध येथे चार दिवशीय निसर्ग संवेदना शिबिर घेण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
केशोरी : वनविभाग गोंदिया आणि वनपरिक्षेत्र गोठणगाव-अर्जुनी-मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन पार्क नवेगावबांध येथे चार दिवशीय निसर्ग संवेदना शिबिर घेण्यात आले. यात गोठणगाव परिक्षेत्रामधील माध्यमिक शाळांतूून १५३ विद्यार्थ्यांना निसर्गप्रेमी अभ्यासक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांची अभ्यासाबरोबर परिसरातील निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी. वनाबद्दल आपुलकीची भावना वाढीस लागावी, निसर्गाबद्दल संवेदना निर्माण व्हाव्यात व पशुपक्षी यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या दृष्टीने १५ ते १८ मार्च २०१८ पर्यंत ग्रीनपार्क नवेगावबांध येथे निसर्ग संवेदना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. वनविभागाने राबविलेल्या नव्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
शिबिरामध्ये नवोदय हायस्कूल केशोरी येथील ३३ विद्यार्थी, डॉ. राधाकृष्णन हायस्कूल कनेरीचे ३९ विद्यार्थी, दिनदयाल उपाध्य आदिवासी आश्रम शाळेतील ३३ विद्यार्थी, आदिवासी विकास हायस्कूलचे २२ विद्यार्थी, समर्थ आदिवासी आश्रम शाळेतील २६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी निसर्गाचे गाढे अभ्यासक रूपेश निंबार्ते, नवेगावबांध बी.एम. लाडे, डी.एम. बुरीले उपस्थित होते. शिबिरात विद्यार्थ्यांना वनातील वृक्षांची माहिती, पशुपक्षी, औषधी वनस्पती याबद्दल माहिती देण्यात आली.
वृक्ष संवर्धन व लागवडीविषयी आवड निर्माण व्हावी या दृष्टीने सदर शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी मेंढे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जंगलभ्रमती करुन आनंद लुटला.
शिबिरासाठी वनपरिक्षेत्र गोठणगाव, अर्जुनी-मोरगाव येथील वन कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनी सहकार्य केले.