‘चला करूया अभ्यास’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:44+5:302021-07-14T04:33:44+5:30
रामदास बोरकर नवेगावबांध : कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ...
रामदास बोरकर
नवेगावबांध : कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे, तर काही ठिकाणी रेंज नसल्यामुळे, ऑनलाइन शिक्षणाची कोणतीच सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे शिक्षण विभागाकडून ‘चला करूया अभ्यास’ हा उपक्रम राबविला जात असून शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन त्यांना शिकवित आहेत. यात आता ग्राम उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयातील शिक्षकही सरसावले आहेत.
मार्च २०२० पासून कोविड प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण सुरू रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात बहुतांश मुले घरीच बंदिस्त आहेत. अशात घरी राहूनच त्यांचा अभ्यास सुरू रहावा यासाठी सेतू अभ्यासक्रमांतर्गत ‘चला करू या अभ्यास’ हा उपक्रम सध्या शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते बारावीसाठी राबविला जात आहे. यात १ जुलै ते १४ ऑगस्ट या ४५ दिवसांत विद्यार्थ्यांसाठी सेतू शिक्षण (ब्रिज कोर्स) पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. त्यामुळे सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक एस. व्ही. बडोले, जे.एस.हटवार, के.एम.भैसारे, एच.एस.पात्रीकर, एस. ए. नंदेश्वर, एम.यु.घरोटे, आर.के.खेडकर हे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवित आहेत. बाकटी केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप टेंभुर्णे आपल्या केंद्राअंतर्गत ‘चला करूया अभ्यास’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी केंद्र अंतर्गत गावात दररोज भेट देत आहेत.
------------------
घरी किंवा समाज मंदिरात भरते आता शाळा
सम्राट अशोक विद्यालयातील शिक्षक उमरी, सावरटोला, बोरटोला, बीडटोला, भुरशीटोला, मुंगली या गावात जात आहेत. तेथे ५-१० विद्यार्थ्यांचा गट करून कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करून पालकांच्या परवानगीने एखाद्या विद्यार्थ्याच्या घरी, समाजमंदिर, देऊळ, ग्रामपंचायत सभागृह अशा जमेल त्या ठिकाणी शाळा भरवित आहेत. यात नियमित शालेय अभ्यासक्रमासोबतच ब्रिज कोर्सची माहिती देत आहेत. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विद्यालयाचे शिक्षक धडपड करीत आहेत.