दोषींना माफी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:13 PM2017-09-14T22:13:03+5:302017-09-14T22:13:30+5:30
एखाद्या खासगी रूग्णालयापेक्षा शासनाचा जास्त पैसा येथील बाई गंगाबाई रूग्णालयावर खर्च होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एखाद्या खासगी रूग्णालयापेक्षा शासनाचा जास्त पैसा येथील बाई गंगाबाई रूग्णालयावर खर्च होत आहे. मात्र सोयी सुविधांच्या नावावर हे रूग्णालय शासनाच्या नावावर डाग लावण्याचे काम करीत आहे. येथील डॉक्टर्स भ्रष्टाचारात एक दुसºयांशी स्पर्धा करतात. मात्र कामाच्या वेळेस मागे राहातात. जोपर्यंत हे डॉक्टर्स याला आपले वैयक्तिक काम समजणार नाही, तोपर्यंत रूग्णालय व्यवस्थित चालणे शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी हे आपले रूग्णालय समजून काम करावे, अन्यथा कोणत्याही अप्रिय घटनेत दोषीला माफी दिली जाणार नसल्याचा इशारा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.
‘लोकमत’ने पंधरा दिवसांपूर्वी या रुग्णालयातील अनागोंदी कारभाराची मालिका चालवून येथील अवस्थेचा पाढा वाचला होता. त्याचीच दखल घेत आमदार अग्रवाल यांनी सोमवारी (दि.११) रूग्णालयाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या भेटीत आमदार अग्रवाल यांनी, रूग्णालयातील रूग्णांना दिली जाणारी औषधांची व्यवस्था, मागील वर्षभरापासून बंद पडून असलेली एक्स-रे मशीन, निकृष्ट भोजन, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, अनुपयोगी कर्मचारी, पार्कींग व्यवस्था, बंद पंखे, वीज व्यवस्था, अस्तव्यस्त प्रयोगशाळा, पसरलेली घाण आदिंची पाहणी केली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी २०० खाटांचे हे रूग्णालय असताना केवळ १३५ खाटा असल्याचे बघून उर्वरीत ६५ खाटा उपलब्ध करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले. रूग्णालयात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करीत त्याला गती देण्याचे निर्देश दिले. तर नवीन इमारतीतील परीक्षा सभागृहात ५० खाटांची व्यवस्था डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण केली जाणार. यासह तिसºया माळ््यासाठी लिफ्टची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रूखमोडे, शल्यचिकीत्सक डॉ. पातूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, बीजीडब्ल्यू रूग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. संजीव दोडके, डॉ. सुवर्णा हुबेकर, रक्तपेढी व्यपस्थापक डॉ. कावळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. मनिंद्र जुनेजा, सोनोग्राफी विशेषज्ञ डॉ. गौरव बग्गा, कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगर परिषद पक्षनेता शकील मंसूरी, नगरसेवक सुनील तिवारी, भागवत मेश्राम, देवा रुसे, शहर महासचिव अपूर्व अग्रवाल, अॅड.योगेश अग्रवाल, अजय गौर, सुशील रहांगडाले, जहीर अहमद, देवेंद्र अग्रवाल, यशपाल डोंगरे, अंकीत जैन, मेहबूब अली, दिल्लू गुप्ता यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस कार्यकर्ता व रूगणालयातील अधिकारी उपस्थित होते.
विभागीय उपव्यवस्थापकांना दिली माहिती
या भेटी दरम्यान रूग्णालयातील अव्यवस्था पाहून आमदार अग्रवाल यांनी रूग्णालयातूनच थेट नागपूर विभागीय उपव्यवस्थापक डॉ. जयस्वाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. याप्रसंगी त्यांनी डॉ.जयस्वाल यांच्याकडे रूग्णालयातील परिस्थिती मांडत हा प्रकार गांभीर्याने घेत त्वरीत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.