निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, उमेदवारांची प्रचारासाठी धावपळ
By कपिल केकत | Published: November 2, 2023 07:56 PM2023-11-02T19:56:25+5:302023-11-02T19:56:45+5:30
रविवारी (दि.५) मतदान होणार असल्याने नियमानुसार शुक्रवारी (दि.३) प्रचाराला विराम लागणार आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर तीन ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारांनी प्रचारातून चांगलाच जोर लावण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये चांगलाच ज्वर वाढला आहे. रविवारी (दि.५) मतदान होणार असल्याने नियमानुसार शुक्रवारी (दि.३) प्रचाराला विराम लागणार आहे.
जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र पोटनिवडणूक होत असलेल्या चार जागांसाठी फक्त प्रत्येकी एकच अर्ज आला आहे. तर तीन जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. परिणामी चार जागांची निवडणूक अविरोध झाली असून तीन जागांसाठी परत एकदा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. यानंतर आता जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार असून फक्त तीनच जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे.
रविवारी (दि.५) मतदान होणार असल्याने उमेदवारांनी जोमात प्रचाराला सुरुवात केली आहे. गावातील एक-एक घर हुृडकून उमेदवार त्यांच्या घरापर्यंत जाऊन भेट घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये तर थंडीतही निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. अशात नियमानुसार, शुक्रवारी (दि.३) प्रचाराला विराम लागणार असल्याने उमेदवारांनी प्रचारावर आणखी जोर लावला आहे.
४९६० मतदार बजावणार मतदानाच हक्क
या निवडणुकीत ४,९६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातही काही गावांमध्ये महिलांची संख्या असल्याने तेथील उमेदवारांचे नशिब महिलांच्या हाती आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, सर्वाधिक चुरस अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंड-देवलगाव येथे दिसत आहे. कारण, तेथे सर्वाधिक ९ सदस्य व सरपंचांच्या जागेसाठी सार्वत्रिक निवडणूक घेतली जात असून सर्वाधिक ११७४ मतदार तेथेच आहेत.