बाेगस कागदपत्रांवर केली जातेय गुंठेवारीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:51+5:302021-03-09T04:32:51+5:30
गोंदिया : नगर परिषदेंतर्गत गुंठेवारीची नोंद करून यानंतर ते प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जातात. या दोन्ही विभागांंनी कर आकारणी ...
गोंदिया : नगर परिषदेंतर्गत गुंठेवारीची नोंद करून यानंतर ते प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जातात. या दोन्ही विभागांंनी कर आकारणी केल्यानंतर सातबारा तयार केला जातो. मात्र, बोगस गुंठेवारीची नोंद करून प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जात असल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आला आहे. हे बोगस गुंठेवारीचे प्रकरण उघडकीस येऊनसुद्धा नगर परिषदेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार गोंदिया येथील तीन नागरिकांनी गुंठेवारीची खोटी कागदपत्रे तयार करून आणि त्यावर अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून गुंठेवारी नियमानुकुल करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे पाठविली होती. हे प्रकरण नगर परिषदेच्या नगररचना विभागाने मंजूर केल्याचेसुद्धा त्यात दाखविण्यात आले आहे. जी गुंठेवारीची तिन्ही प्रकरणे मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविली होती त्यातील फाईलवर गुंठेवारी आदेश क्र. गुंठेवारी /नपगो/१४/२०२० असे नमूद आहे. मात्र, ज्या भूखंडांचे क्रमांक नोंद करण्यात आले आहेत त्याचा अभिलेखामध्ये शोध घेतला असता त्याची कुठेही नोंद नाही, तसेच आवकजावक क्रमांकाचीसुद्धा त्यात नोंद नाही. त्यामुळे हे गुंठेवारीचे आदेेश बनावट स्वाक्षरी आणि शिक्के मारून तयार केल्याचा ठपका ठेवला, तसेच यासंबंधीचे पत्रसुद्धा तहसील कार्यालयाने नगर परिषदेला २१ जानेवारी २०२१ ला पाठविले. अशीच अनेक बोगस प्रकरणे असल्याची शंकासुद्धा व्यक्त केली. ज्या तीन बोगस अर्जदारांनी गुंठेवारीची ही बोगस प्रकरणे तयार केली त्यांची नावेसुद्धा नगर परिषदेला कळविण्यात आली. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून असे प्रकरण तयार केले जात असताना यावर नगर परिषदेने अद्यापही कुठलीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
........
नगररचना विभागातील ‘तो’ कर्मचारी कोण
नगर परिषदेच्या नगर रचना विभागातील एक कर्मचारी या कामात सक्रिय असल्याची माहिती आहे. यापूर्वीदेखील असा प्रकार उघडकीस आला होता. हाच कर्मचारी अशी प्रकरणे तयार करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन याप्रकरणी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.