२८ जूनपासून गुरुजींची शाळेत हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:55+5:302021-06-18T04:20:55+5:30
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. आता सर्वत्र संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहार ...
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. आता सर्वत्र संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहार सुरळीत होत आहे. त्यातच शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि दहावी ते बारावीचे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइनच वर्ग सुरु होणार असून गुरुजींना शाळेत हजेरी लावावी लागणार आहे.
जिल्ह्यात पहिली ते नववीच्या एकूण १०३९ शाळा असूृन ८८०० शिक्षक आहेत. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुध्दा पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्याने काही दिवस विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले जाणार आहे. यंदा नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव घरूनच होणार आहे. मागील वर्षीचे शैक्षणिक वर्षही कोरोनाच्या संक्रमणामुळे वाया गेले. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले आहे. असे असले तरी पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या. विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहेत. सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थितीत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे शिक्षण संचालकांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. विद्यार्थी, शिक्षकांची ओळख आभासीच उन्हाळी सुट्ट्यांनंतर २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे. गतवर्षीही टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा आनंद घेता आला नाही. यंदाही शिक्षक आणि विद्यार्थी यांची तोंडओळख आभासीच करून घ्यावी लागणार आहे.
..........
उजळणीने होणार सुरुवात
शिक्षण विभागाने जारी केलेल्या सूचनांनुसार यंदाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी याबाबत कोणत्याही सूचना करण्यात आल्या नाही. शैक्षणिक सत्रासंदर्भात कोणताही आराखडा स्पष्ट करण्यात आला नसल्याची खंत मुख्याध्यापक वर्गाकडून व्यक्त होत आहे.
.......
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘बिज कोर्स’ उपक्रम
जिल्हा परिषदेच्या ८०० शाळा विलगीकरणासाठी देण्यात आल्या होत्या. सर्व शाळा स्वच्छ करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शिक्षक गृहभेटी देतील. शासनाच्या आभासी शिक्षण देण्याच्या सूचना असल्या तरी जिल्ह्यात ही प्रणाली यशस्वी नाही. त्यासाठी बिज कोर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांच्या तीन टप्प्यात प्रथम शिक्षण देण्यात येणार आहे. या अनुषंगाने त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येणार असल्याचे गोंदिया जि.प. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी सांगितले.