बदलीसाठी गुरूजींची कॉपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:32 PM2018-07-30T21:32:49+5:302018-07-30T21:34:12+5:30
विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केली तर त्यांच्यावर कारवाही केली जाते. विद्येच्या मंदिरात शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करुन पास होण्याऐवजी अभ्यास करुन पास व्हा असा सल्ला देतात. मात्र यासर्व गोष्टींचा काही शिक्षकांनाच विसर पडल्याचे चित्र आहे.
Next
ठळक मुद्देपडताळणीत ७२ शिक्षक दोषी : सीईओंकडे अहवाल, शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल
<p>अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केली तर त्यांच्यावर कारवाही केली जाते. विद्येच्या मंदिरात शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करुन पास होण्याऐवजी अभ्यास करुन पास व्हा असा सल्ला देतात. मात्र यासर्व गोष्टींचा काही शिक्षकांनाच विसर पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील काही शिक्षकांनी आपल्या मर्जीच्या ठिकाणी जाण्यासाठी बदली अर्जासोबत खोटी प्रमाणपत्रे जोडल्याची धक्कादायक बाब पुढे आली. दरम्यान या प्रकाराची शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून खोटी प्रमाणपत्रे जोडणाऱ्या शिक्षकांचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मे महिना लागताच जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू होतो. यात सर्वाधिक बदल्या या शिक्षकांच्या असतात. मागील वर्षीपासून बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचे कारणच नाही. पण, काही शिक्षकांनी आपल्या सुपीक डोक्यातून यावर मार्ग शोधून काढला. गोंदिया जि.प.प्राथमिक शिक्षण विभागातर्फे यंदा जून महिन्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. यात जवळपास दोन हजार शिक्षक बदलीस पात्र ठरले होते. यासर्व शिक्षकांची बदली प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीन राबविण्यात आली. त्यामुळे काहींना त्यांच्या मर्जीच्या ठिकाणी जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी यावर उपाय शोधून काढला.
काही शिक्षकांनी बदलीसाठी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे प्रमाणपत्र जोडले, तर काहींनी यापुढे जात खोटी प्रमाणपत्रे जोडून आपल्या मर्जीच्या ठिकाणी बदली करुन घेतली. दुर्गम, आदिवासी बहुल भागात आपली बदली होवू नये, यासाठी बराच खटाटोप केला.
एकाच ठिकाणी दहा ते पंधरा वर्षे काढल्यानंतर सेवानिवृत्त देखील याच ठिकाणावरुन होता यावे, यासाठी काही शिक्षकांनी प्रयत्न केले. पण, या सर्वांचा फटका बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना बसला. त्यामुळे त्यांनी बदली प्रक्रियेवर आक्षेप घेत शिक्षणमंत्र्यांपर्यंत तक्रार केली. बदलीसाठी शिक्षकांनी जोडलेल्या प्रमाणपत्रांचीे तपासणी करण्याची मागणी केली. त्यानंतर शिक्षण विभागाने जिल्ह्यातील तालुका निहाय शिक्षकांनी बदलीसाठी जोडलेल्या अर्ज आणि त्यांनी जोडलेल्या प्रमाणपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू केले. त्यात पहिल्या टप्प्यात एकूण ७२ शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे आढळले. तर दुसºया टप्प्यातील छाननी सुरू असून येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण अहवाल तयार होणार आहे. त्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता खुद शिक्षण विभागाचे अधिकारीच वर्तवित आहे. बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल कारवाहीसाठी शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा.दयानिधी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर यावर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी त्यांच्या मर्जीच्या ठिकाणी बदल्या करुन घेतल्या. तर काही ठिकाणी पदे रिक्त नसताना सुध्दा वेळेवर पद रिक्त करुन त्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या लक्षात ही बाब आली नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय
मागील सात आठ वर्षांपासून आदिवासीबहुल व दुर्गम भागात कार्यरत आणि खरोखरच आजारी असलेले शिक्षक बदलीस पात्र असताना सुध्दा केवळ बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे जोडून बदली करुन घेतल्याने त्यांना बदलीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय झाल्याची चर्चा शिक्षकांच्या वर्तुळात आहे.
खोटी प्रमाणपत्रे देणाºयावर कारवाईची गरज
काही शिक्षकांनी बदलीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गंभीर आजाराचे प्रमाणपत्र तयार करुन घेवून ते आपल्या अर्जाला जोडल्याची माहिती आहे. अर्जांच्या पडताळणी दरम्यान ही बाब सुध्दा निदर्शनास आल्याची माहिती असून खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्याची मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवर काही शिक्षकांनी आक्षेप घेतल्यानंतर अर्जांची पडताळणीचे काम सुरु आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कारवाहीसाठी हा अहवाल जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल.
- उल्हास नरड
शिक्षणाधिकारी गोंदिया