गात्राच्या जांभळांची गोंदियात चलती
By admin | Published: June 12, 2017 01:31 AM2017-06-12T01:31:25+5:302017-06-12T01:31:25+5:30
केवळ पूर्व विदर्भात मोठ्या आणि जांभळसर रंगाची जांभळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केवळ पूर्व विदर्भात मोठ्या आणि जांभळसर रंगाची जांभळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतात. या जांभळांची चव काहीशी तुरट असल्याने ती अनेकांच्या पचनी पडत नाहीत. नागपूरसारख्या शहरात एखादवेळी गावरान जांभळं दिसतात. जी काळी असतात. चवीला मधुर आणि गोड असतात. अशी ही जांभळं गोंदिया जिल्ह्यातील गात्रा या गावात मोठ्या प्रमाणात होतात.
गोंदियात सध्या गल्लोगल्ली फिरणाऱ्या विक्रेत्यांकडे ही जांभळं मोठ्या प्रमाणात विक्रीला आली असून, बाहेरगावची मंडळी मोठ्या चवीने ही जांभळं खात आहेत.
जांभूळ म्हटले की तोंडाला आपसूकच पाणी सुटते. कडक उन्हाने तोंडाची घालवलेली चव येण्यासाठी जांभूळच योग्य उपचार आहे. बाजारात दाखल झालेली जांभळं बघितल्यानंतर ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली...’ हे गीत सहज ओठांवर येते. गोंदियात गल्लीबोळात हातगाड्यांवरील फळविक्रेत्यांकडे गात्राची जांभळं ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जून महिना हा गर्द निळ्या-काळ्या जांभळांचा असतो. जिभेचे चोचले पुरविणारे जांभूळ आणि निसर्गाचे अतूट नाते आहे. ढगांना वेध लागतात पावसाचे तर जांभळांना वेध लागतात पिकण्याचे. अशी महती असलेल्या जांभळांनी फळबाजारात हळुवार शिरकाव केला आहे. सध्या गोंदियाच्या बाजारपेठेत दाखल् झालेली अस्सल गावरान जांभळं बालाघाट परिसरातील गात्रा या भागातून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व छत्तीसगड या भागात उत्पादित होणारी मोठ्या आकाराची जांभळं सध्या बाजारपेठेत विक्रीस आलेली नाहीत. सध्या गोंदियात गल्लोगल्लीत गावरान जांभळं घेऊन विक्रेते फिरत आहेत. प्रतिशेर १० रुपये भावाने जांभळांची विक्री होत आहे.
जांभूळ या वृक्षाची पाने गुरे-ढोरे मोठ्या चवीने चाखतात. गोंदिया तालुक्यातील मोठा परिसर आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यातील परिसरातसुद्धा सर्वाधिक जांभळाची झाडे रानावनात दृष्टीस पडतात. गत काही वर्षांपासून अवैध वृक्ष कटाईमुळे रानावनात असलेली जांभळाची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन विभागाने आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या जांभळाचे वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सूर वृक्षप्रेमींनी काढला आहे.
मुंबईकर नागरिक रानावनात उत्पादित होणारी जांभळं खाणे पसंत करीत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व गोंदिया जिल्ह्यातील गात्रा येथील जांभळांची अधिक मागणी नोंदविली आहे. सध्या जांभळांचा हंगाम वाढला असल्याने १० रुपये प्रतिशेर म्हणजे सुमारे ४० रुपये प्रतिकिलोच्या दराने जांभळांची विक्री होत आहे. जांभळामुळे शरीरातील वाढत असलेले मधुमेहाचे प्रमाण रोखण्यास मदत होते, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. विशिष्ट ऋतूत आगमन होणाऱ्या जांभळाला अन्य फळांच्या तुलनेत लोक खाणे अधिक पसंत करतात. जांभळामुळे काही प्रमाणात रोजगार देखील मिळत आहे.