गतिमंद मुलीला केले आईवडिलांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:21 AM2018-04-11T00:21:11+5:302018-04-11T00:21:11+5:30
गतिमंद असलेली १५ वर्षाची मुलगी आई वडीलांच्या नजरेआड झाली. फिरता-फिरता गावापासून ३० कि. मी अंतरावर असलेल्या खमारी येथे पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गतिमंद असलेली १५ वर्षाची मुलगी आई वडीलांच्या नजरेआड झाली. फिरता-फिरता गावापासून ३० कि. मी अंतरावर असलेल्या खमारी येथे पोहचली. ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या गतिमंद मुलीवर कुदृष्टी पडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली. सामजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्या मदतीने मुलीच्या आई-वडीलांचा शोध घेवून त्या मुलीला तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले.
तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथील १५ वर्षाची गतिमंद मुलगी ५ एप्रिलला रात्री १०.३० वाजता गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील बसस्थानकावर एकटीच दिसली. त्या निरागन मुलीवर कुदृष्टी पडू नये यासाठी व ती सुरक्षीत स्थळी पोहचावी म्हणून खमारीचे पोलीस पाटील चव्हाण यांनी पुढाकार घेऊन त्यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार भीमराव आडे यांना फोन करून तीची माहिती दिली. ती बसस्थानकावर उभी असलेली मुलगी केवळ स्वत:चे नाव सांगते आई-वडीलांचेही नाव सांगू शकत नाही. गावाचा पत्ता तिला माहित नाही, असे सांगितल्यावर पोलीस हवालदार भीमराव आडे व महिला पोलीस शिपाई भाविका टेंभूर्णीकर हे दोघेही त्या मुलीला घेण्यासाठी खमारी बसस्थानकावर आले. तेथे त्यांना ती मुलगी मिळाली. तिला त्यांनी पोलीस ठाण्यात नेले. हॉटेलातून जेवण बोलावून तिला जेवन दिले. त्यानंतर तिला भाविका टेंभूर्णे यांच्या स्वाधीन केले. या कार्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर यांनी मदत घेतली. डॉ. बेदरकर यांनी त्या गतिमंद मुलीला चार-पाच ड्रेस दिले. ६ व ७ तारखेला सतत आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात माहिती पाठविली. तिकडे या मुलीच्या वडीलांनी तिरोडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. ती मुलगी गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या हातात लागल्याने तिरोडा पोलिसांनी तिच्या आई वडीलांना माहिती देऊन गोंदियाला पाठविले. वडील फादअली हुसेन, आई मीनाद हुसेन, भाऊ आमिन हुसेन यांनी तिला ओळखले. त्यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसांना बेपत्ता असल्याची रिपोर्ट दाखविली. आधारकार्ड दाखविले. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलीसांनी कारवाई करून डॉ. सविता बेदरकर यांच्या समोर तिला आई वडीलांच्या स्वाधीन केले.
तिच्या पालकांसाठी ३६ गावात फिरले
गतिमंद असलेल्या त्या मुलीला तिचे आईवडील मिळावे यासाठी सविता बेदरकर यांच्या सोबत गोंदिया ग्रामीण ठाण्याचे पोलीस गोंदिया व गोरेगाव तालुक्यातील ३६ गावात फिरले. सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली. व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपवर माहिती टाकल्याने ती मुलगी काचेवानी येथील असल्याचा तिरोडा पोलीस ठाण्यातून फोन आला. परिणामी ती मुलगी आपल्या आई वडीलांना भेटली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भीमराव आडे व महिला पोलीस शिपाई भाविका टेंभूर्णीकर यांनी बजरंगी भाईजानची भूमिका बजावली.