ई-मेल हॅक करून क्रेडिट कार्ड बनविले, ३५ लाखांचे कर्ज उचलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:32 PM2024-10-14T17:32:22+5:302024-10-14T17:33:32+5:30
१३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल : ४ लाखांचे उत्पन्न असताना दाखविले ९४ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तरुणाचे आधार कार्ड, पैन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून क्रेडिट कार्डच्या आधारावर तरुणाच्या नावावर ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्या रकमेतून सोने व इतर साहित्य आरोपींनी घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह या कामात सहभागी असणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १५ नोव्हेंबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान हा प्रकार करण्यात आला.
आमगाव तालुक्यातील शिवजीनगर बनगाव येथील विजय कुशन कोरे (३३) या तरुणाचे उत्पन्न ४ लाख ८० हजार असताना आरोपींनी ९४ लाख रुपये त्याचे उत्पन्न दाखवून त्याच्या नावावर ३७ लाखांच्या कर्जाची उचल विविध बँकेतून केली. त्यांचा मोबाइल व ई-मेल आयडी हॅक करून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी ३५ लाखांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्या रकमेतून सोने व इतर साहित्य खरेदी करून विजय कोरे यांच्या नावाने बिल तयार केले. आयटीआर चुकीच्या पद्धतीने रिव्हाइस करून त्यांची ९४ लाखांचे उत्पन्न दाखवित कर्जाची उचल केली.
विजय कोरे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने आमगाव येथील न्यायालयाच्या आदेशावरुन आमगाव पोलिसांनी १३ आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ४२३, ४६४, ४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरूपती राणे करीत आहेत.
आरोपींमध्ये यांचा समावेश या प्रकरणात आरोपी मनोज हिरालाल जुनघरे, रा. गोकुल नगर गडचिरोली, निखिलकुमार नरेंद्रसिंह कोसले रा. कमल विहार ४ रायपूर (छत्तीसगड), मंगेश लालाजी दुर्गे, रा. गोकुळनगर गडचिरोली, विकीसिंग नरेंदसिंग कोसले (५७) कमल विहार सेक्टर ८ रायपूर, नीलेश लोकेश सुनहरे रा. कमल विहार सेक्टर ८ रायपूर, संगीतासिंग कोसले रा. सी ५७ कमलीवार सेक्टर रायपूर छत्तीसगड, आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड कंपनीमधील अधिकारी व इतर अधिकारी अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.