शेतकऱ्यांच्या आशेवर ‘गारपीट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:11 PM2018-02-14T21:11:35+5:302018-02-14T21:12:17+5:30
खरीप हंगामात अल्प पाऊस व कीडरोगांमुळे झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. यासाठीच दिवसरात्र मेहनत आणि रक्ताचे पाणी करुन व शिल्लक असलेली जमापुंजी रब्बी पिकासाठी खर्ची घातली.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : खरीप हंगामात अल्प पाऊस व कीडरोगांमुळे झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. यासाठीच दिवसरात्र मेहनत आणि रक्ताचे पाणी करुन व शिल्लक असलेली जमापुंजी रब्बी पिकासाठी खर्ची घातली.यातून चांगले उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सुदैवाने पिके देखील चांगली आली होती. मात्र मंगळवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या या सर्व आशांवर पाणी फेरल्या गेले. भरुन आलेली शेतातील पिके गारपीट, वादळामुळे आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर गारपिटीचा उतारा चढल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली आल्याचे चित्र होते.
हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी विदर्भात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला होता. मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर रात्री १० वाजताच्या दरम्यान जिल्ह्यातील काही भागात जोरदार गारपीट झाली. गोरेगाव, तिरोडा, सालेकसा, आमगाव तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. घरे आणि गुरांच्या गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी (दि.१४) सकाळीच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेत पिकांची पाहणी केली. कालपर्यंत उभे असलेली शेतातील पिके गारपीट आणि वादळी पावसामुळे आडवी झाल्याचे पाहुन शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते. ज्या पिकांच्या भरोश्यावर सावकार आणि बँकाकडून कर्जाची उचल केली. पिके निघल्यानंतर देणी फेडून वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करता येईल असे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले होते. मात्र गारपीट आणि वादळी पावसामुळे त्यांचे हे स्वप्न भंगले. पिके भूईसपाट झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे.
जिल्ह्यात यंदा रब्बीचे ३४ हजार हेक्टर क्षेत्र असून यात प्रामुख्याने गहू, हरभरा, धान, लाखोळी या पिकांचा समावेश आहे. दीड हजार हेक्टरवर फळ पिकांची लागवड आणि दीड हजार हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिरोडा, गोरेगाव तालुक्यातील भागात गारांचाच पाऊस पडला. त्यामुळे रस्ते आणि घरासमोरील अंगणात गारांचा सडा पडल्याचे चित्र बुधवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास बघावयास मिळाले. गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार, पाथरी, सिलेगावपासून ते बोडूंदापर्यंत गारामुळे जणूकाही आपण काश्मिरात आहोत असा भास होत होता. पिडंकेपार रेल्वे चौकीच्या अंडरग्राऊंड पुलाखाली सुध्दा गारांचा खच पडल्याचे चित्र होते.गारपीटीमुळे लाखोळी, हरभरा, गहू, धानासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपिटीचा फटका भाजीपाला पिकांसुध्दा बसला. वांगे, मिरची, टमाटर, शेंगा या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी व महसूल विभागातर्फे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक गठीत करण्यात आले.हे पथके जिल्ह्यातील आठही तालुक्यात सर्वेक्षण करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहेत.
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी बुधवारी (दि.१४) सकाळी गोरेगाव तालुक्यातील गावांना भेट वादळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पंचायत समिती सदस्य केवल बघेले, डुमेश चौरागडे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी शेताची पाहणी करुन तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी सेवकांना दिले.
गारपिटीमुळे पक्ष्यांचा मृत्यू
जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीचा फटका पिकांसह पशु पक्ष्यांना सुध्दा बसला. गारपिटीमुळे गोरेगाव तालुक्यातील सलंगटोला, मुंडीपार व तिरोडा तालुक्यातील सुकडी-डाकराम, बुचाटोला येथे पक्ष्यांचा मृत्यू झाला. यावर पर्यावरण प्रेमीनी दुख: व्यक्त केले. गारपिटीमुळे जखमी झालेल्या पशु पक्ष्यांवर उपचार करण्याची मागणी केली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी सुध्दा गारपीटीमुळे पक्षी आणि वन्यप्राण्यांना हाणी झाली का याची शोध मोहीम सुरू केल्याची माहिती आहे.
४०० हेक्टरमधील पिकांना फटका
जिल्ह्यात यंदा ३४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात ८ हजार हेक्टरवर हरभरा, ६ हजार हेक्टरवर गहू आणि २६ हजार हेक्टरवर भाजीपाला व इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४०० हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. तर फळबांगाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गारपिटीचा ४५ गावांना फटका
महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात गारपिट आणि वादळी पावसाचा गोेरेगाव, देवरी, तिरोडा आणि सालेकसा तालुक्यातील ४५ गावांना फटका बसला आहे. तर वादळामुळे या चारही तालुक्यातील १२५८ घरांचे अंशता नुकसान झाले. तर शेकडो गोठ्यांची पडझड झाली आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना निर्देश देण्यात आले आहे.
भाजीपाल्याचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. यंदा खरीप हंगाम हातून गेल्याने शेतकºयांनी उपलब्ध सिंचन साधनाच्या मदतीने भाजीपाल्याची लागवड केली. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा दीड हजार हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र गारपीट आणि वादळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.