साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:17 PM2018-02-17T23:17:01+5:302018-02-17T23:17:22+5:30

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.

 Hailstorms hit by 4000 hectares, storm hits | साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

Next
ठळक मुद्दे३५१ गावे बाधित : १० हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासन मदतीसाठी नेमके कोणते निकष लावून मदत जाहीर करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मागील खरीप हंगामात कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळायचीच असताना आता रब्बी पिकांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आशेवर पूर्णत: पाणी फेरल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे सुरूवातीला कृषी विभागाने ४०० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे केल्यानंतर तब्बल ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आले आहे. यात गहू, हरभरा, लाखोळी, भाजीपाला, धान या पिकांचे व आंबा, केळी, अ‍ॅपल बोर या फळबांगाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल २ हजार ८४१ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर १४८९ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गारपीट व वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू व वटाण्याचे पीक भूईसपाट झाल्याने त्यांच्या हाती काहीच येणार नसल्याचे चित्र आहे. रब्बीतील पिके हातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर केलेला लागवड खर्च आणि कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे शासन नुकसान भरपाईपासाठी कोणता निकष लावून मदत जाहीर करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगर
खरीप व रब्बीतील पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी बँका आणि सावकारांकडून उचल केलेल्या कर्जाची परफेड कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या डोंगरखाली आल्याचे चित्र आहे.

Web Title:  Hailstorms hit by 4000 hectares, storm hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.