ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:16+5:302021-09-02T05:02:16+5:30
गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे ...
गोंदिया: कोरोनाने पछाडल्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गंभीर परिणाम मानव शरीरावर होत आहे. त्यात शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट झाल्यामुळे रुग्णांच्या शरीराची हानी होत आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने अनेक रुग्णांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या औषधीमुळे जीवनसत्त्व व प्रथिने यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना आता केस गळतीचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही विषाणूशी लढताना शरीरातील विविध जीवनसत्त्वाची हानी होते. कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करते. कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे ही तीव्र असल्याने तसेच ती औषधे अधिक काळ घ्यावी लागत असल्याने त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.
......................
कोविडनंतर ३ महिन्यांनी गळू लागतात केस
कोरोनाशी लढा देताना वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे विविध प्रकारचे जीवनसत्त्व नष्ट होतात. त्याचा विपरित परिणाम मानव शरीरावर होत असतो. कोविडची औषधी घेणाऱ्या लोकांची तीन महिन्यानंतर हळूहळू केस गळू लागतात. प्रथिने मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ही प्रथिने किंवा जीवनसत्त्वे नैसर्गिकदृष्ट्या घेतली तर ते आरोग्यासाठी लाभदायी आहे.
.............
हे करा...
-आहारात अधिक प्रथिने असलेली जसे अंडी, मोड आलेले कडधान्य, दूध यांचा वापर करावा.
- शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी संपूर्ण आहाराची गरज असते त्यासाठी संपूर्ण आहार घ्यावा.
- कोरोनामुळे शरीरात खूप थकवा येतो यासाठी पुरेपूर झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी, शरीरात पाण्याची पातळी योग्य राहील याची खबरदारी घ्यावी.
- शरीरात क व ड जीवनसत्त्व जातील असा आहार घ्यावा.
.......................
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...
- कोरोना बरा झाल्यानंतर कोरोना काळात केलेल्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्व नष्ट होते.
- काही रुग्णांना कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात थकवा येतो. श्वसनात अडचण होते. खोकला होत राहतो.
- प्रथिनांच्या कमतरतेमुळे काही लोकांचे केस गळतात. त्यामुळे काही लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.
- घरगुती उपचार काहीवेळ घातक ठरत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे मत आहे.
..........................
कोट
कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे व कोरोना विषाणूशी लढताना होणाऱ्या जीवनसत्त्वाची हानी, प्रथिनांची कमतरता यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो. यासाठी भरपूर पाणी प्या व प्रथिने युक्त पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे.
- डॉ. नोव्हील ब्राह्मणकर, गोंदिया.