हलबीटोला रेल्वे भुयारी बोगदा ठरतोय कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:30 PM2018-09-03T21:30:32+5:302018-09-03T21:30:56+5:30
येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला आहे. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांसाठी हा बोगदा कर्दनकाळ ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला आहे. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांसाठी हा बोगदा कर्दनकाळ ठरत आहे.
हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने भुयारी बोगदा तयार केला आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुलाखालील बोगद्यात बारा फुट पाणी साचले आहे. सोमवारी (दि.३) सकाळी हलबीटोलावासीयांनी बोगद्यात नेहमीच पाणी साचून राहत असल्याची तक्रार केल्यावर पदाधिकारी या बोगद्यातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले. पाणी किती आहे हे पाहण्यासाठी एका मुलाने बोगद्यात उडी मारली. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडत असल्याची शंका आल्यावर स्वत: रेखलाल टेंभरे यांनी पाण्यात उडी मारली व त्या मुलाला सुखरुप पाण्याबाहेर काढले.
हलबीटोला (प्रभाग क्रं. ०५) च्या जवळ रेल्वे विभागाने भुयारी बोगदा तयार केला आहे. २०१० मध्ये या भुयारी रेल्वे बोगद्याचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून या रेल्वे बोगद्यात नेहमीच पाणी साचून राहते. हलबीटोलावासीयांना गोरेगावला ये-जा करण्यासाठी नेहमीच कसरत करावी लागते. रविवारी (दि.२) रात्रीच्या वेळी या रेल्वे बोगद्यात दोन इसम बुडता बुडता वाचल्याची माहिती आहे. तर सहा महिन्यापूर्वी बोगद्याच्या पाण्यात एका गर्भवती महिलेला घेवून जात असलेली रुग्णवाहीका अडकली होती. गावकºयांच्या सहकार्याने त्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यात आले. या रेल्वे भुयारी बोगद्यात नेहमीच पाणी साचून राहत असल्यामुळे प्रभाग क्रं. ५ हलबीटोलावासीयांनी पॉवर हाऊस जवळून रस्त्याची मागणी केली आहे.
या संदर्भात येथील समाजसेवक रेखलाल टेंभरे, नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी जायस्वाल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यांनी दोन दिवसात गोरेगाव येथे येवून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
पावसाळ्यात तुटतो संपर्क
हलबीटोला भुयारी बोगद्यात पावसाळ्यात नेहमी आठ ते दहा फुट पाणी साचले असते. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करता येत नाही. परिणामी गावकºयांचा गोरेगावशी संपर्क तुटतो. यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सुध्दा नुकसान होते.
अन्यथा रेल रोको करणार
हलबीटोला भुयारी बोगद्याच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय लवकरात लवकर करा, गावकºयांना ये-जा करण्यासाठी वेगळा मार्ग तयार करुन देण्यात यावे.अन्यथा या विरोधात रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष आशिष बारेवार, समाजसेवक रेखलाल टेंभरे, भाजपचे संजय बारेवार, गुड्डू कटरे, अनिल राऊत गावकºयांनी दिला आहे.