हळदीघाट मकरसंक्रांत यात्रा साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:50+5:302021-01-13T05:14:50+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यातील हळदीघाट येथे दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त भरणारी यात्रा या वर्षी कोरोना संक्रमणामुळे अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आली आहे. ...
सडक-अर्जुनी : तालुक्यातील हळदीघाट येथे दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त भरणारी यात्रा या वर्षी कोरोना संक्रमणामुळे अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आली आहे. हळदीघाट देवस्थान समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
चूलबंद नदीघाटावर हळदीघाट येथे जवळपासची ४-५ गावे मिळून दरवर्षी यात्रेचे आयोजन करतात. येथे भाविक नंदीपिंडी तयार करून पूजाअर्चना व स्नान करून गूळ-पोहे व तिळाचे लाडू खाऊन मकरसंक्रांत साजरी करतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्यापासून चालत आली आहे. सर्वप्रथम १४ जानेवारी रोजी घटस्थापना व १५ जानेवारी रोजी घट विसर्जन व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात येत होते. हळूहळू हळदीघाट येथे यात्रेचे स्वरूप निर्माण झाले. त्यानंतर सन २००५ मध्ये गहाणे यांनी या देवस्थानात हनुमान, गणपती, विठ्ठल-रखुमाई व शंकराच्या मूर्तीची स्थापना केली. हळदीघाट येथे दरवर्षी मकरसंक्रांतीला लाखो भाविक येऊ लागले आणि या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप आले. सन २००९ मध्ये गोपीनाथ गहाणे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सुरेश गहाणे जय दुर्गामाता देवस्थान समितीचे अध्यक्ष झाले व आपल्या वडिलांची परंपरा त्यांनी पुढेही सुरूच ठेवली. २०१३ मध्ये देवस्थानचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. दरवर्षी समितीच्या वतीने १५ जानेवारी रोजी यात्रेचा समारोप करून महाप्रसाद वाटप केले जाते. महाशिवरात्रीला ९ दिवस भागवत सप्ताहाचे आयोजन करून महाप्रसाद वाटप केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे यात्रा अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष सुरेश गहाणे व उपाध्यक्ष गणपत मोडकू झिंगरे यांनी सांगितले. मात्र यात्रेत येणारे दुकानदार ठरावीक अंतर ठेवून आपली दुकाने लावू शकतात व सामानाची विक्री करू शकतात.
.....
१९७० पासून झाली यात्रेची सुरुवात
१९७० मध्ये साकोली तालुक्यातील ग्राम विर्शी येथील गोपीनाथ गहाणे यांची पत्नी आई-वडिलांना एकुलती एक मुलगी असल्यामुळे ते घाटबोरी येथे सन १९७० मध्ये स्थायिक झाले. त्यांनी सन १९७१ मध्ये चूलबंद नदीघाटावर हळदीघाट येथे १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्ताने पूजा-अर्चना केली. गहाणे यांच्या संकल्पनेतून तवाडे महाराज (भूगाव-मेंढा) यांच्या हस्ते दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.