शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यात दीड लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:44 PM2019-05-17T21:44:38+5:302019-05-17T21:45:08+5:30
शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच तीच पिके घेतली जात असल्याने जमिनीची पोत देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे.
डी.आर. गिरीपुंजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच तीच पिके घेतली जात असल्याने जमिनीची पोत देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. मात्र नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येत तिरोडा तालुक्यातील बिहिरीया येथील एका शेतकऱ्याने शेतीतील बोडीच्या मदतीने शिंगाड्याची शेती करुन आठ महिन्यात दीड लाखाचे उत्पन्न घेतले.यात त्यांना ९० हजार रुपयांचा शुध्द नफा झाला. बोडीमध्ये शिंगाड्याची यशस्वी शेती करुन त्यांनी शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करुन धान पिकाला पर्याय सुध्दा दिला आहे.
डुलीचंद नारायण पटले रा.बिहिरीया असे शिंगाड्याची यशस्वी शेती करणाºया शेतकºयाचे नाव आहे. पटले यांच्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात भात पीक, रब्बी हंगामात गहू, कोरडवाहू पिकांची लागवड करतात. धान पीक म्हटले की जास्त व हमखास उत्पादनासाठी संरक्षित सिंचनाची गरज असते. धानाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाधानी नव्हते. यासाठी ते सतत कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या संर्पकात होते. सन २०१५-१६ वर्षी त्यांच्या गावाची निवड सेंद्रीय शेतीसाठी झाली. मी सुद्धा त्यात स्वच्छेने सहभागी झालो. सुरुवातीला ही शेती नवीन वाटली. परंतु त्या शेतीत वापरले जाणारे खत हे बाजारपेठेतून न आणता घरच्या घरी तयार करण्याचे प्रशिक्षण कृषी सहायक अजय खंडाईत दिले.त्यामुळे खतावरील खर्चाची बचत झाली. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच मी एक एकर शेती संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केली. त्यासाठी लागणारे दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत, गांडूळ खत,हिरवळीचे खत घरीच तयार केले. हळू हळू उत्पादनात वाढ होऊन खर्चाची बचत झाली. बाजारात माझ्या तांदळाची मागणी वाढली. रासायनिक तांदळाच्या तुलनेत प्रती किलो १५ रुपये जास्त मिळू लागले. कृषी विभागातंर्गत मागेल त्याला बोडी योजनेतंर्गत शेतात बोडी तयार केली.बोडीत शिंगाड्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात बोडीत शिंगाड्याची लागवड केली.८ महिन्याच्या कालावधीत पीक हातात आले. विशेष म्हणजे शिंगाडा पिकाला कोणत्याही प्रकारचा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मशागतीचा खर्च कमी येतो. शिंगाड्याची बाजारात विक्री करण्याची गरज नाही. छोटे-छोटे व्यापारी बांधावर येवून शिंगाडे खरेदी करतात. मागील हंगामात शिंगाड्याच्या शेतीतून १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून खर्च वगळता ९० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. त्यानंतर बोडीत पाणी शिल्लक असल्याने त्यात मत्स्यबीज सोडले. ते आता एक ते दीड किलोपर्यंत झाले आहे. त्यामुळे बोडीचा तिहेरी लाभ झाल्याचे पटले यांनी सांगितले. यासाठी कृषी सहायक अजय खंडाईत, कृषी पर्यवेक्षक रहांगडाले, मंडळ कृषी अधिकारी मोहाडीकर,तालुका कृषी अधिकारी एम.ए.वावधने आणि एस.आर.पुस्तोडे व उमेश सोनेवाने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे सांगितले.