कुचकामी नळयोजनेमुळे अर्धा गाव तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:22+5:302021-08-12T04:33:22+5:30
तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वडेगाव येथील जुनी पाणी पुरवठा योजना संपूर्ण गावाला पाणी पुरविण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने येथे ...
तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वडेगाव येथील जुनी पाणी पुरवठा योजना संपूर्ण गावाला पाणी पुरविण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने येथे नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सुमारे एक कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाणी टाकी उभारण्यात आली. योजनेची पाणी टाकी उभारून बऱ्याच कालावधीनंतर न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली निघताच गावातील इतर काही ग्रामपंचायत सदस्य नेत्यांनी विद्यमान सरपंच बघेले यांना डावलून तसेच विश्वासात न घेता हे काम आपल्या हाती घेऊन गावात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले. मात्र, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, अर्धवट पाईपलाईन टाकून काम अर्धवट सोडून याकामी पुढाकार घेणारे ग्रामपंचायत सदस्य मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे वडेगावाच्या अर्ध्या भागात नळयोजनेचे पाणी मिळत आहे, तर अर्धे गाव अद्याप तहानलेलेच आहे. याप्रकरणी स्वतः सरपंच बघेले यांनी पुढाकार घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहमतीने पाईपलाईन व नळ योजनेची कामे पूर्णत्त्वास नेऊन गावातील नळ योजनेचे पाणी सुरळीत सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.